Wednesday, 29 June 2016

आज ढळत्या वयात-

सावधान शब्द ऐकताच
रामदासांनी बोहल्यावरुन पळ काढला.
उपासना, साधना ,कठोर तपस्या करुन
स्वामी झाले.समर्थ झाले.
मी मात्र अधीर होतो सावधान शब्द ऐकण्या साठी
तो शब्द कानावर पडताच कोण आनंद झाला!
गळ्यात माळ पडावी म्हणून कोण घाई!
क्षणिक आनंद होता तो.

तेव्हां पासून गमावलं काय ,मिळवलं काय
याचा हिशोब केला.
आज ढळत्या वयात ताळा केल्यावर कळलं
हाती काहीच आलं नाही.
प्रपंच लटका.
दुःखाचे डोंगरच वाट्याला आले.
सुख क्षणिक.
अश्रूंची गणतीच नव्हती
जखमा तर रोज रोज होत राहिल्या.
तरीही सावध झालो नाही.
जाग आली नाही.
कळलं आकळलं नाही.
वेदनांच्या डोहात पुन्हा पुन्हा लोटला गेलो.
तरी पोहायची हौस  फिटली नाही.
भवसागर तरायची आस अजून तशीच आहे.
रडता रडता जगणं. क्षणोक्षणी मरणं
असंच चाललंय.असंच चालत राहील
उदास मनाला मनाचे श्लोक ऐकवायचे
उपासना साधना शून्य.

रामदास सूद्न्य होते.मी मात्र अद्न्य,अडाणी,
वेडा जीव.
वेडावणारं जीवन जगायची हौस होती.
ती अपूर्णच.
वेड घेऊन नेहमीच पेडगावला मात्र जावं
लागलं.
नियती,प्रारब्ध, कर्मगती हीच दुसरं काय?

No comments:

Post a Comment