Monday, 27 June 2016

हा क्षण उत्कटतेने जगूया

हा क्षण उत्कटतेने जगूया
सावधतेने जगूया
जागृत राहून जगूया
क्षण क्षण क्षण क्षण हो परिवर्तन
अणू अणूचे चाले नर्तन
देहा मधले हे संवेदन
   अलिप्ततेने बघूया
आनंदाची ऊर्मी येता
रोम रोम हो पुलकित
प्रेमप्रवाहे क्षणोक्षणी
    रसमय तनमन करूया
अगणित कानी येती मृदु स्वर
माधुर्याचे होई सिंचन
झरझर झरती अमृतधारा
सवे तयांच्या ताल धरूनी
     मधु मधु गुंजन करूया
शब्द , रूप ,रस,गंध, स्पर्शही
सारे सारे क्षणभंगुर हे
अनुभव  साचा हा सर्वांचा
प्रत्यय येतो या सत्याचा
      दर्शन त्याचे करूया
क्षणोक्षणी ये नवनव अनुभव
भवचक्राचे फिरणे अविरत
आहे त्याला अनुग्रह जाणुन
     उदासीन राहूया
साक्षीभाव हा येता येता
पदोपदी दृढ होते समता
प्रद्न्या जागृत होते मग ती
     दैन्य दुःखही जाते विलया

1 comment:

  1. विपश्यना साधनेची अनुभुती हा या कवितेचा विषय होय

    ReplyDelete