Sunday, 25 September 2016

चक्र हे असंच फिरत राह्यचं _---

माझ्यातला मी शोध शोधून
सापडत नाही.
मीची ओळख होत नाही .
जगणं मात्र चाललंय
गती अक्षुण्ण..
भाव,भावना,स्वप्ने,कल्पना,
विकार, विचारम्हणजेच मी.
आकृतीबंध मोठा.
मूळ त्याचं चैतन्यात
अदृश्य  शक्तीत
सर्वाभूती सर्वेंद्रियात
असते ती.

जाणीव तिची होताच
लखकन प्रकाश पडतो
अंधार दूर होतो
स्वतःची स्वतःलाच
ओळख होते.
वास्तव वस्तूतून डोकावतं
कळतं _
वस्तूच्या अंगप्रत्यंगातून
प्रवाही असतं जे
तेच चैतन्य
माझं खरं रूप असतं

प्रवाही असतं ते
धाव त्याची संपताच
माणसाचीही धाव संपते
विसावतं सारं सारं
इंद्रियेही निष्प्राण होतात

जीव कुडी सोडून जातो.
मुक्त होतो
नव्या प्रवासासाठी
वाहनाचा शोध घेतो.
स्वतःसाठी स्वतःच्या
पसंतीचं वाहन निवडतो.
नवी कुडी नवा जन्म
पुन्हाप्रवास न संपणारा
अनादी काळा पासून
अनंत काळा पर्यंत
असंच चालत राहील हे

प्रवहाचं वैशिष्ठ्यच असतं
सारखं पुढे पुढे जायचं
समुद्रात विलीन व्हायचं
तिथून पुन्हा मेघ होऊन
अंतराळात जायचं
उंची गाठून
पुन्हा खाली यायचं
प्रवाही व्हायचं
चक्र हे असंच फिरत राह्यचं
यालाच जीवन म्हणायचं
.












































  

No comments:

Post a Comment