Saturday, 17 September 2016

तू तर मृगेंद्र----

झोपू नकोस,जागाहो
जंगलचा राजा तू.
तू तर मृगेंद्र शक्तीशाली,साहसी
उगीच मेंढरू बनू नकोस.
स्वयमेव मृगेंद्रता
हेच ब्रीद,हेच लक्ष्य,
स्वभाव हाच.
स्वत्व विसरून म्यॉं म्यॉं करू नकोस.
डरकाळी ऐकताच तुझी
सारे थरथरा कांपतील
शेपट्या घालून, भयभीत होऊन
दूरदूर पळून जातील

शिकार तुझी तूच शोधून काढ
स्वतःची शिकार होऊ देऊ नको
स्वतःच्या तेजाची, ओजाची लाज ठेव
लाचार ,दीन,हीन बनू नको.
उगीचच कुणापुढे हात पसरून
भीक मुळीच मागू नकोस.

शक्ती स्वतःची पणाला लावून
श्री,धी,खेचून आणायची असते
पुरूषार्थ असतो संघर्षात
भित्र्यांना जग भिववतं
त्यांचं सारं लुटून नेतं.
कफल्लक झाल्यावर
छिः थू अपमान पदोपदी

कणाहीन माणसांचे कळपच कळप
सर्वत्र नशिबाला दोष देत
रोजरोज हजारदा मरत असतात
दगडाच्या देवाला साकडं घालत असतात.
"बाबा रे,तूच सांभाळ आता"
आळवणी करत असतात.

दुबळ्यांच्या हाकेला देव ओ देत नसतो
हाल अपेष्टा पाहात पाहात
दगडी मूर्तीत दगड होऊन
अलिप्तपणे पाहात असतो

No comments:

Post a Comment