Wednesday, 14 September 2016

तरीही माणुस बेसावध---

बंद डोळ्यापुढे
चालती,बोलती असंख्य चित्रे
रुंजी घालतात,वेडावतात,
वेड लावतात,हसवतात कधी कधी
रडवतात नेहमीच.
भेसुर चेहरे,क्रूर चेष्टा,धुंदडोळे
सारे सारे चक्षुर्वैसत्यम्
क्षणभंगूर,क्षणजीवी
तरीही प्रभावी.

नको ती स्वतःची
रूपं ती दाखवतात.
चिडवतात,डिंवचतात
गोडचिमटा काढतात
भद्रतेतील अभद्रता
सोजवळतेतील बिबत्सता
असत्यातील सत्यता
निष्ठुरपणे दाखवतात
स्वप्ने म्हणतात त्यांना

तिथली दुनिया  खरी नसते
तिला मुळी अस्तित्व नसतं.
तरीही मनाला कधी ती सुखावतात
बऱ्याचदा दुखावतात.

स्वप्ने पाहायची इच्छा नसते
तरी ती पिच्छा सोडत नसतात.
गाढ झोपेचं खोबरं करून
झोप मात्र उडवतात
झोपी गेलेल्या जागा हो
म्हणून ती खुणावतात
तरीही माणुस बेसावध
सावध तो होत नाही
स्वप्ननांना अस्तित्व असतं
हेच समजून घेत नाही.

No comments:

Post a Comment