Friday, 30 September 2016

जाऊ का बाहेरी ?

जाऊ का बाहेरी ?कुंठित झाला जीव एकला
बसुनी या कोटरी
का म्हणता मम पंख कोवळे
अफाट नभ मज मार्ग नाकळे
संघर्षा विन जीवनात ना
यशस्विता ये पुरी--------------------
अरुण पांगळा करतो हितगुज
सूर्योदय आवाहन दे मज
क्षणोक्षणी नव रूपे घेऊन
हसती मेघ सुंदरी-------------------
स्वैर फिरावे नि्ळ्या नभातून
इकडून तिकडे तिकडून इकडे
कधी आसरा वृक्ष लतांचा
घ्यावा मी क्षणभरी ----------------
मी न नेभळा दुर्बल जीव
 स्वत्वाची मम मज जाणीव
मलाही बघुद्या मम पंखांची
शक्ती थोडी तरी-------------------
कोण कुणाची सदैव असतो
काळ कधितरी ओढुन नेतो
एकलेच जगण्याचा येतो
प्रसंग सर्वां वरी-----------------
चुकेल माझा पंथ कदाचित्
थकतिल कोमल पंख मानूया
परंतु चुकता चुकता निश्चित
जाईन धेय्यपुरी ----------------- 
निळ्या निळ्या त्या पर्वतराजी
उंचउंच वृक्षांच्या राया
निर्झरिणींचा नाद ही मंजुल
मोहवी मज भारी---------------
मी न एकला समाज मोठा
त्याहून मोठे विश्व ऐकतो
स्वतः बघू दे निक्षून मजला
कक्षा त्यांच्या तरी ---------------

No comments:

Post a Comment