Friday, 30 September 2016

मत्त मयूरा, नाच नाच रे----

  मत्त मयूरा, नाच नाच रे
  नभात घनमाला
अंधकार जरी दिशात दाही
चित्त तुझे रोमांचित होई
उभव पिसारा लाजव त्या तू
इंद्र धनुष्याला----------
पुलकित कण कण पृथ्वीवरचा
हरितांकुरही हलती डुलती
आतुरले  हे वृक्ष सज्ज तव
नृत्य पाहाण्याला ----------
पक्षी सारे स्तब्ध कोटरी
वायू तृण पर्णावर बसला
अनिमिष नयने चाखण्यास तव
रूप माधुरीला ----------
बघ कंपन तव हृदयी होई
थरथरली तव पिसेंही चतुरा
उचल पाऊले टाक मोहुनी
विचार रे कसला---------
वायु धरिल बघ सुंदर ताला
कोकिल घेईल मधुरही ताना
वृक्षलताही डुलवतील मग
रसिका सम माना--------

जाऊ का बाहेरी ?

जाऊ का बाहेरी ?कुंठित झाला जीव एकला
बसुनी या कोटरी
का म्हणता मम पंख कोवळे
अफाट नभ मज मार्ग नाकळे
संघर्षा विन जीवनात ना
यशस्विता ये पुरी--------------------
अरुण पांगळा करतो हितगुज
सूर्योदय आवाहन दे मज
क्षणोक्षणी नव रूपे घेऊन
हसती मेघ सुंदरी-------------------
स्वैर फिरावे नि्ळ्या नभातून
इकडून तिकडे तिकडून इकडे
कधी आसरा वृक्ष लतांचा
घ्यावा मी क्षणभरी ----------------
मी न नेभळा दुर्बल जीव
 स्वत्वाची मम मज जाणीव
मलाही बघुद्या मम पंखांची
शक्ती थोडी तरी-------------------
कोण कुणाची सदैव असतो
काळ कधितरी ओढुन नेतो
एकलेच जगण्याचा येतो
प्रसंग सर्वां वरी-----------------
चुकेल माझा पंथ कदाचित्
थकतिल कोमल पंख मानूया
परंतु चुकता चुकता निश्चित
जाईन धेय्यपुरी ----------------- 
निळ्या निळ्या त्या पर्वतराजी
उंचउंच वृक्षांच्या राया
निर्झरिणींचा नाद ही मंजुल
मोहवी मज भारी---------------
मी न एकला समाज मोठा
त्याहून मोठे विश्व ऐकतो
स्वतः बघू दे निक्षून मजला
कक्षा त्यांच्या तरी ---------------

Thursday, 29 September 2016

ढगाळलेली संध्या यावी---

ढगाळलेली संध्या यावी
मधुनच बिजली कधी चमकावी
मुख चंद्राची छबी सखी तव
केवळ पळभर उजळ दिसावी

शंकित डोळे उं हूं अथवा
हळुच म्हणावे पाहिलना कुणी
गडगडता झणी  मेघ  पडावा
करवेलींचा  विळखा  नामी

कुंतल छे.अवगुंठन ते
वायूसंगे कुजबुज करता
सावरतांना न कळत कळता
मुख चषकातील शराब प्यावी

धुंद होउनी तुला छळाया
अशीच यावी रात्र सुगंधी


तरल वाऱ्यानं---

तरल वाऱ्यानं कुठून तरी आणला
चुरगाळलेला कागद एक
रंग गुलाबी छोटा कपटा
गरगर फिरत पडला दाराशी
एकाकी
दुपारची वेळ
कडक ऊन.
उगीचच गेले डोळे फिरायला बाहेर.
तिथून निघाले दोन तीक्ष्ण शर
शिरले डोळ्यात
मिटले गपकन.
तरळल्या अनेक मुद्रा क्षणात त्या
असंख्यशी गरगर फिरलीत गुलाबी पत्रे
काही निळी,काही पिवळी
हलक्या रंगाची.
अक्षरं मोतीदार झळकली डोळ्या पुढे
कमलाक्ष मिचकावले बोलके कुणीतरी
काळ्याभोर पापण्यातून
ठिबकणाऱ्या शाईनं लिहलेलं
खारट पत्र शेवटचं
आठवलं.स्तंभित मी.

उचलला कपटा अन् पाहिलीत अक्षरं
कसलं काय
धुंद वास
कुठलासा उग्र दर्प
परदेशी अत्तराचा शिरला नाकात
तीन चार सोनेरी केस
बस् काहीच नाही.
कुणीतरी तारुण्याच्या उन्मादात
मदमत्त होऊन गाठली असेल मस्तानी
काळानं कठोरपणे
कालवली असेल माती जेवणात त्याच्या
आठवणीची गोड खूण
सप्रेम भेट
आज मात्र वाऱ्यावर स्वैर भैर
तिकडे तो धुंडाळत असेल कोपरा न् कोपरा
इकडे
अचानक माझ्या मनाचे उघडलेत कप्पे सारे.
आठवला
सोनेरी काळ पिसं लावून निघून गेलेला
दूरवर
असाच या कपट्या सारखा
गुलाबी शराबी डोळ्यांची आठवण ठेवून मागे.
मनहूस बेटा.

फसवा साक्षात्कार -----

स्वप्नपरीसम आलिस दारी
गेेलिस माघारा
स्मृति कोषातच
गंध राहिला पुष्पाविण सारा---धृ
रेखिव बांधा,उजळ चेहरा
गौरकाय तू कुणी अप्सरा
फिरता फिरता कुंजवनी या
अवचित शर मज काय मारला
विद्ध दोन नजरा-------------
बोल लाडके मुग्ध हासणे
लबाड तव डोळ्यांचे लवणे
तनुलतिके तव पुढे चालणे
मादक उन्मादक स्पर्शाचा
शिंपित मधु फुलोरा-----------
रात्र धुंद अन् मस्त चांदणे
निवांत सारे नभात तारे
संगतीस तू अवखळ अन् मी
प्रिती प्राशन करुनी केला
धुंद नदी किनारा------------
हास भास तव स्पर्श डंख अन्
बोल प्रतिध्वनी ध्वनीच केवळ
तानही अर्धी रागही अर्धा
मैफिल अर्धी सोडुन सजणे
गेलिस माघारा-------------
क्षण फसवा मम अंतर वेडे
खळखळणाऱ्या निर्झरीणीतटी
त्याच प्रस्तरी बसुन अनुभवी
चैतन्याविण तव मूर्तीच्या
फसव्या साक्षात्कारा---------

Wednesday, 28 September 2016

आनंदाने जगायचं---

त्यांना मुळी वेळ नसतो
सगळाच खेळ असतो
डाव चुकला म्हणून
म्हाताऱ्यांनी रडायचं नसतं..

 सारंच एकदा झटकून टाकावं
 स्वतःच समजून घ्यावं
त्यांच्या नादात त्यांना राहू द्यावं
आपलं आपण दुरून पाहावं

 सोसायला हिंमत लागते.
सोसता सोसताच मुक्यानं
शेवटचा श्वास शांत व्हावा
अशी इच्छा ठेवायला हवी.

रडायचं एकट्यानंच
चार चौघात हसायचं
रीत ही जर पाळली
तर तणाव पळून जातो.

त्यांच्या साठी खूप केलं
कष्ट सोसून वाढवलं
म्हणायची सोय नाही
तोट्याचा व्यवहार

तोंड दाबून बुक़्क्याचा मार
नशीब खोटं आपलंच 
प्रारब्ध ,नियतीचा न्याय हा
म्हणत म्हणत
आनंदाने जगायचं

Tuesday, 27 September 2016

वेडे चार --

तिथंच मंदिरात जमतात ते
फाटके चेहरे ,विटकी वस्रे
चोरून   आपापली  अंगे
कट्ट्यावर बसतात चौघे

तो दणकट पोलादी पुरुष
लांब मिशा झुपकेदार
डोळेही  पाणीदार
हळूच म्हणतो-
"क्या करे? यार नहीं प्यार नहीं,
मौत नहीं,
इसलिए जी रहा हूँ दिनचार ."

उंच टोपी काळीशार
गळा गोड, बोटे चतुर
वाद्यावरून फिरतात
म्हणतो तो-
"माझं मला विसरायचंय
नको घर, नको दार
भुकेलेली पोरं
ओरडणारी मंडळी
मरायचंय या इथंच देवा समोर."

तिसऱ्याचे डोळे लुकलुकतात
चष्मा हळूच थरथरतो
 जिवणी आतंच घुटमळते.
"शिकलो मी खूपखूप
भाराभर पुस्तके
कोरडी ती
वशिल्याशिवाय भाव नाही
पैशा शिवाय वशिला नाही
महणून मी बेकार "

चौथा हसतो खदखदून
खर्जात लावतो स्वर
"उगीच नको उठाठेव
आज कापले खिसे चार
बस् चंगळ चार रोज
काय हवं काय नकाे?
हेच सांगा
उगीच का पिसायची
रोजरोज तीच पानं?
जाऊ दे
घ्या.फुका.चिलीम ही"

----हवेत उठतात वर्तुळं
पुनःपुन्हा पुनःपुन्हा
तीच चिलीम पेटते
तिथंच मग विसावते
भयाण रात्र
स्तबधता
पिंपळपानं हलतात
कुठून येतो घु घुत्कार
म्हणतात लोक---
"झोपले
त्या तिथं .देवळात त्या.
वेडे चार"

Monday, 26 September 2016

रामदास व मी

सावधान ऐकताच रामदास सावध झाले.
बोहल्यावरुन माघार.
तप केले,स्वामी झाले
समर्थ झाले.

मी मात्र अधीर होतो.
सावधान शब्द ऐकण्यासाठी
 तो शब्द कानावर पडताच
 कोण आनंद  झाला.
गळ्यात माळ पडावी
म्हणून कोण घाई!

क्षणिकच आनंद होता तो.
तेव्हां पासून मिळवलं काय?
गमावलं काय ?
याचा हिशोब केला.

आज ढळत्या वयात
ताळा केल्यावर कळलं
हाती काहीच आलं नाही.
प्रपंच लटका.
दुःखाचे डोंगरच वाट्याला आले.
अश्रूंची गणतीच नव्हती.
जखमा तर रोज रोज होत राहिल्या.
तरीही सावध झालो नाही,
जाग आली नाही.
 कळलं आकळलं नाही.
वेदनांच्या डोहात पुन्हा पुन्हा
लोटला गेलो

तरी पोहायची हौस फिटली नाही.
भवसागर तरायची आस
अजून तशीच आहे.
रडता रडता जगायचं
क्षणोक्षणी मरायचं.
असंच चालत राह्यलंय
म्हणून उदास मनाला
समजावत राह्यचं.

रामदास सूद्न्य होते
मी अडाणी,वेडा जीव
वेडावणारं जीवन जगायची हौस होती.
ती अपूर्णच.
वेड घेऊन पेडगावला नेहमीच
जावं लागलं.
नियती,प्रारब्ध,कर्मगती हीच
दुसरं  काय?

Sunday, 25 September 2016

जगात मात्र नेहमी प्रमाणे घडत असतं--

आकाश ढगाळतं.
सर्वत्र अंधारतं.
विजा कडाडतात.
वारा घोंगावतो.
अचानकच घडतं.
मनातही चलबिचल.
एकटं एकटं बसावंसं वाटतं.
खोल खोल हृदयात
डोकावण्याचा संकल्प
तिथं उठणारं तुफान
पाह्यची अभिलाषा

प्रत्यक्षात मात्र
वेगळंच घडतं.
मन  पेटतं.आग भडकते.
विकार उसळतात.
विचार भरकटतात.
काही काही कळेनासं होतं

जगण्यातआनंद नसतो.
श्वासात खुमारी नसते.
वाणीत ओज नसतं.
तेज नसतं
डोळे मात्र पाणावतात
 आतल्या आत.
हृदयही एकट्यानं
रडत असतं.
जगात मात्र
नेहमी प्रमाणे घडत असतं.

सूर्य उगवतो.
दुपार उजळते.
संध्या रंग उधळते.
पक्षी गातअसतात
वारे घोंगावतात.
झरे झुळझुळ वाहातात

कोणाचेच कोणाला
कसलेच देणे घेणे नसते.
जो तो आपापल्या मस्तीत
धुंदीत
आपापल्या चालीनं
संथ वा तेज गतीनं
आपापल्या वर्तुळात
धावत असतो
न थांबता, न विसावता.

चक्र हे असंच फिरत राह्यचं _---

माझ्यातला मी शोध शोधून
सापडत नाही.
मीची ओळख होत नाही .
जगणं मात्र चाललंय
गती अक्षुण्ण..
भाव,भावना,स्वप्ने,कल्पना,
विकार, विचारम्हणजेच मी.
आकृतीबंध मोठा.
मूळ त्याचं चैतन्यात
अदृश्य  शक्तीत
सर्वाभूती सर्वेंद्रियात
असते ती.

जाणीव तिची होताच
लखकन प्रकाश पडतो
अंधार दूर होतो
स्वतःची स्वतःलाच
ओळख होते.
वास्तव वस्तूतून डोकावतं
कळतं _
वस्तूच्या अंगप्रत्यंगातून
प्रवाही असतं जे
तेच चैतन्य
माझं खरं रूप असतं

प्रवाही असतं ते
धाव त्याची संपताच
माणसाचीही धाव संपते
विसावतं सारं सारं
इंद्रियेही निष्प्राण होतात

जीव कुडी सोडून जातो.
मुक्त होतो
नव्या प्रवासासाठी
वाहनाचा शोध घेतो.
स्वतःसाठी स्वतःच्या
पसंतीचं वाहन निवडतो.
नवी कुडी नवा जन्म
पुन्हाप्रवास न संपणारा
अनादी काळा पासून
अनंत काळा पर्यंत
असंच चालत राहील हे

प्रवहाचं वैशिष्ठ्यच असतं
सारखं पुढे पुढे जायचं
समुद्रात विलीन व्हायचं
तिथून पुन्हा मेघ होऊन
अंतराळात जायचं
उंची गाठून
पुन्हा खाली यायचं
प्रवाही व्हायचं
चक्र हे असंच फिरत राह्यचं
यालाच जीवन म्हणायचं
.












































  

Saturday, 24 September 2016

सारं सारं निमुटपणे पाहावं लागतं---

निसर्गात सारं कसं चिडीचुप गिडीगुप
नकळत घडत असतं
कुठे कुठे कुणा कुणाला
काहीही कळत नसतं
आपसुक परिवर्तन
रातंदिन होत असतं
गडबड नसते,गोंधळ नसतो
आरडा ओरड मुळीच नसते
ईर्ष्या द्वेष असुया
भांडण  तंटा  मारामारी
यातील कुणाचा मागमूस नसतो
हवेतलं  परिवर्तन
सोसाट्याचा वारा
भयंकर प्रभंजन
रिमझिम बरसात
वा मुसळधार पाऊस
विनाशक ढगफुटी
धरतीचं फाटणं
सुनामी, ज्वालामुखी
सार् अचानक घडतं
घडल्यावर सारं सारं
हळूहळू शांत होतं
निसर्गात
कुठलेच प्रश्न नसतात
वायफळ चर्चा नसते
असं का तसं का
सौंदर्य वा कुरुपता
कसलीच खंत नसते
 नियतीच्या मनात असेल
तसं घडत असतं
तुफान सारं गेल्यावर
सगळीकडे कसं
शांत शांत असतं
निसर्गाची रूपं सारी
माणसाला प्रिय असोत
अप्रिय असोत
माणसांना,पशु पक्ष्यांना
निसर्गातल्या
चेतन अचेतन,दृष्य अदृष्य
सजीव निर्जीव सष्टीला
निमुटपणे सारं सारं
पाहावं लागतं.-

कामरूप मन--

कामरूप मन
क्षणोक्षणी बदलत असतं.
नवे नवेआकार घेऊन
स्वैर नाचत असतं.
नाचवत असतं
इच्छा असो नसो
तालावर त्याच्या
पावलं उचलावी लागतात.
नव्हे उचलली जातात.
गती त्याचीअगम्य.
क्षणातगाठतं स्वर्गास
तर क्षणात नरकात
जाऊन बसतं.

शुद्ध स्वच्छ पारदर्शी निरिच्छ
स्फटिकासम.
घाणेरडं तितकच
दुर्गंधीनं गच्च भरलेल्या
गटारीसम.
वाहातं स्वच्छ
झऱ्यासम.
गंभीर सागरा सारखं.
खळाळणारं
वेगानं धावणाऱ्या
नदीसम

जेव्हां बेचैन असतं
तडफडतं फडफडतं
जख्मी पक्ष्यासम

शांत असतं तेव्हां
दिसतं नितळ
स्तब्ध तळ्यासम.

उद्विग्न होतं तेव्हां
वखवखतं
ज्वालामुखीसम.

क्रोधात तर
बेभान बेफाम होतं
हिंस्र बनतं ते
चेकाळलेल्या वाघा सम
हल्ला प्रतिस्पर्ध्यावर
करतं ते
ओकतं आग अंग प्रत्यंगातून
डोळ्यातून बाहेर पडतात
ठिणग्या असंख्य.
बेताल मनाचा थयथयाट
भयंकर असतो

तेच प्रेमानं दयेनं करुणेनं
भरलं जातं तेव्हां
आर्द्र, आर्त होतं
ढाळतं अश्रू
निपचित.

Friday, 23 September 2016

तरीही नद्या दुषित का ?

आकाशातल्या मेघांना
प्रश्न एक भेडसावतो
आम्ही तर पृथ्वीवर
 शुद्ध पाणीच पाठवतो
तरीही नद्या दुषित का
 विषाक्त का ?

त्यांना मुळी माहीत नसतं
माणसानं  औद्योगिक प्रगती  केली.
प्रचंड कारखाने उभारले
दिवस रात्र चालतात ते
त्यातली रसायने,मैला
याच नद्यातून वाहातो
त्याने पाणी विषारी होतं
दुषित होतं.

जीव  देणारं  मूळचं पाणी
जीव  घेणारं बनतं
माणसाचं सान्निद्य
इतकं भयानक असतं
याची मेघांना ओळख असती
तर त्यांनी मुकाट्याने
वर्षानुवर्षे अनादि काला पासून
पृथ्वीवर शुद्ध पाण्याची शिंपण
केलीच नसती.

Thursday, 22 September 2016

आता मात्र सारेच बदलले--

झुंजूमुंजू होताच लखकन डोळे उघडायचे
प्रातःस्मरण व्हायचं.शौच्य,स्नान आटोपून
गीता पठन व्हायचं.
न्याहरी,नास्ता होऊन वाचन,चिंतन,मनन
लेखन ,रोजचा परिपाठ,व्यायाम,योगासने.

आता मात्र ,सारेच बदलले.
डोक्यावर सूर्य येतो,तेव्हां कुठे डोळे उघडतात.
सी डी  किंवा  क्यासेट  वाजत  असते.
प्रातःस्मरण,नाम जप,भजन,कीर्तन'साऱ्या साऱ्या
ध्वनिफिती, चित्रफिती.टीव्हीच्या पडद्यावर
नाना चित्रे,,प्रवचने,बातम्या,सत्संग,उद्बोधन
नाटके,सिनेमे,तमाशे.चर्चा,वार्तापत्रे,कथा,कविता,
पुस्तके जागतिक माल मसाला.जाहिरातींचा खच
काय नसते?

घरांचं घरपण संपल.घरे होम थिएटरस् झालीत
चहा नास्ता,जेवण टीव्ही पुढेच
एकमेकाशी बोलणं नाही चालणं नाही.संवाद
मुळीच नाही.
म्हणूनच जीवनात सु संवाद राहिला नाही.
उरली ती औपचारिकता,स्नेहशून्य सहानुभूती

माणुस आत्ममग्न स्वतःच्या विश्वात स्वतः भोवती
फिरतोय गिरक्या घेत.
बेफिकिर,बेदरकार,बेफाम,बेलगाम,स्वच्छंदपणे
भौतिक सुखाची वाढतेय लालसा.
हे हवं ते हवं हाव काही संपत नाही,स्थैर्य नाही
अतृप्त समंध तृप्त 'होत नाही.होणार नाही.
सुख,शांती,समाधान काही काही मिळत नाही
मिळनार नाही
धावणं माणसाचं संपणार नाही लक्ष्यपूर्ती
होणार नाही
युगधर्म हा पाळायलाच हवा.नाहीतर स्पर्धेतून
केव्हा बाद केलं जाईल
हीच भीती भेडसावते.य

Wednesday, 21 September 2016

मुखवटा मात्र सर्वोदयी ----

जात,जमात, संप्रदाय
संकुचित विचारधारा
कल्याणकारी राज्य हे
लक्ष्य आमचे.
म्हणत म्हणत
जात,जमात,संप्रदाय
यांचाच आधार घेऊन
मतांची लढाई जिंकतात

जिंकल्यावर जात,जमात,
संप्रदाय ,धर्म निरपेक्ष
तत्वांचा विजय म्हणून
गाजावाजा केला जातो.

प्रत्यक्षात
जातीची ,जमातीची ,संप्रदायाची,
आपल्याच अनुयायांची
शक्ती कशी वाढेल
याकडेच लक्ष ठेवून योजना
आखत असतात.

मुखवटा मात्र सर्वोदयी
धारण करून
सत्य, अहिंसेसाठी
झटतोय म्हणून
त्यांच्या विजयासाठी
असत्य,हिंसा, क्रौर्य वा
प्रतिशोधाचाच मार्ग
चोखाळतांना दिसतात.

उक्ती व कृतीतलं अंतर
सारखं वाढतंय नाही का?

Tuesday, 20 September 2016

म्हणून ती सांड बनते---

बंगला असतो ऐस पैस,पैसाही वारेमाप
कामाला छोट्या मोठ्या अगणित घरगडी.
फिरायला कुठेही रोज रोज नवी गाडी
.सारी सारी सुखं इमानी कुत्र्यासम
पायाशी लोळतात.
खायची प्यायची ददात नसते
हिराफिरायला अटकाव नसतो
संपत्ती चरण चुरते.

पायाखाली
सोन्या चांदीचा,हिरे, माणके,रत्नांचा
खच असतो.

हुंगायला फुलं असतात.
उंची अत्तराच्या कुप्या
स्नानासाठी हमामखाने
पुष्करिणी स्वतःसाठी.

क्षणोक्षणी बदललीत तरी
संपायची नाहीत इतकी वस्त्त्रे.
आधुनिक अत्याधुनिक वेषभूषा ,केशभूषा
स्नो ,पावडर, लिप्सटिक्स
मौल्यवान प्रसाधने

व्हिडियो घरातअसतो मनपसंत मनोरंजन
हवी तेव्हा हवी ती ब्लू फिल्मही पाहाता येते.

घरात ती एकटीच असते.कुठलंच बंधन नसतं.
बेछूट बेदरकार बेबंद स्वातंत्र्य,
इतकंअसून रितंरितं सुनंसुनं एकटं एकटं वाटतं

लहानपणा पासूनच आई ऐवजी दाईचं दूध मिळतं.
पप्पा तिकडे तस्करीत मग्न
मम्मी इकडे क्लब मध्ये मस्करीत धुंद असते.
त्यांना मुळीच वेळ नसतो.दोघेही एंगेज्ड
यंग एज उपेक्षित.
बाह्य गरजा भागतात अनायास विना सायास.
मन मात्र एकटे पणाला घाबरतं.
कुणीच आपलं मिळत नसतं .तेव्हां

अल्सेशियन कुत्रा वा ऑस्ट्रेलियन पप
यांनाच ते जवळ करते
चुंबा चुंबी त्यांची पाहून लोकांनाआश्चर्य वाटतं
तिची तिच्या शरीराची वयाची,तिच्या भावभावनांची
अंतःस्रावाची भयानक भूक,
कुणालाच कळत नसते
तिचं शमन केल्याशिवाय तिला मुळी चैन नसते.

तिचं दुःख तिलाच माहीत असतं
दुःखावरचं जालीम औषध तिनंच शोधून काढलं असतं
तिची कुणाला पर्वा नसते
तीही  बेपर्वा बनते
उच्च भ्रू म्हणून तिची हेळसांड होते.
म्हणून ती सांड बनते .
ती तरणी बांड असते

Monday, 19 September 2016

हीच यांची ख्वाइश असते----

सूट सफारी हिप्पीकट,बारीक डोळे ,मिटले ओठ
बेल बॉटम किंवा लुंगी,सैल झब्बे घालून
गटागटात येतात ते.
मनगटात गट नसतात.नट कसले बानट असतात
पोरींच्या वेषात पोरे असतात.
टगे दिसतात,बघे असतात.बायकी चाल ,बायकी बोल
मुळूमुळू हळू हळू
खुळ्यांना या मस्तवाल तथाकथित कॉल गर्ल्स पर्ससाठी
गठवतात.झक्कपैकी कटवतात.

सायंकाळी बारमध्ये एकच धूम उडते.सोडा,बियर,व्हिस्की
थोडी थोडी चुस्की .
वेड्यांना नाद लागतो.नाच क्याबरे सुरू होतो.म्हणता म्हणता
रात रंगते.
नाचताना काहीही करतात ते.अंगविक्षेप,चावट चेष्टा,नग्न चाळे
आस्वाद हवा तो, हवा तसा .ओठा पासून देठा पर्यंत.
 कुणालाच भान नसते.
बेभान होऊन आस्ते आस्ते रात झिंगते.झिंगता झिंगता गीत
म्हणते.

इथं मधुमंदिरात स्कीन करन्सीची चलती असते.
स्क्रिन लाइफ,ग्ल्यामर.सारं सारं इथं मिळतं.
स्वातंत्र्याच्या नावाने स्वैराचार स्वैर नाचतो.
बेचैन,अतृप्त समंधांना,वासनेनं लुत लागलेल्या कुत्र्यांना
खाज जिरवणारं,लाज घालवणारं,
निर्लज्ज उघडं नागडं शरीर मिळतं.

हनी म्हणून मिळेल ते चाखायचं,नंबर टू खर्चून
ए वन मॉडेल मिळवायचं.
 "लाइफ इज फन.यू फनी बी हनी.
टेक मनी.
मेक माय नाइट सनी"
म्हणत म्हणत
स्वतःच स्वतःला विसरायचं,असंच जीवन घालवायचं.
हीच यांची ख्वाइश असते.
रोज नवी फरमाइश असते.
 

Sunday, 18 September 2016

आजचं कौटुंबिक वास्तव---

उठा म्हणताच
उठावं.
बसा म्हणताच
बसावं
चला म्हणताच
हूं चू न करता
निमुटपणे चालावं

नजरबंद होऊन
 नजरेच्या इशाऱ्यावर
सारं सारं करावं
तरीही राणी सरकार
नाखुष

प्रतिसाद- उपेक्षा,अतृप्ती
,आदळआपट,
अकारण अकांडतांडव,
फरफट,असंतोष,
असमाधान, तणातणी.

संसार संसार यालाच म्हणायचं
जोजार सारा सहन करुन
हसत हसत राहायचं
गळ्या पर्यंत फसल्यावरही
गुपचुप बसायचं.

हेच आजचं कौटुंबिक वास्तव.

Saturday, 17 September 2016

तू तर मृगेंद्र----

झोपू नकोस,जागाहो
जंगलचा राजा तू.
तू तर मृगेंद्र शक्तीशाली,साहसी
उगीच मेंढरू बनू नकोस.
स्वयमेव मृगेंद्रता
हेच ब्रीद,हेच लक्ष्य,
स्वभाव हाच.
स्वत्व विसरून म्यॉं म्यॉं करू नकोस.
डरकाळी ऐकताच तुझी
सारे थरथरा कांपतील
शेपट्या घालून, भयभीत होऊन
दूरदूर पळून जातील

शिकार तुझी तूच शोधून काढ
स्वतःची शिकार होऊ देऊ नको
स्वतःच्या तेजाची, ओजाची लाज ठेव
लाचार ,दीन,हीन बनू नको.
उगीचच कुणापुढे हात पसरून
भीक मुळीच मागू नकोस.

शक्ती स्वतःची पणाला लावून
श्री,धी,खेचून आणायची असते
पुरूषार्थ असतो संघर्षात
भित्र्यांना जग भिववतं
त्यांचं सारं लुटून नेतं.
कफल्लक झाल्यावर
छिः थू अपमान पदोपदी

कणाहीन माणसांचे कळपच कळप
सर्वत्र नशिबाला दोष देत
रोजरोज हजारदा मरत असतात
दगडाच्या देवाला साकडं घालत असतात.
"बाबा रे,तूच सांभाळ आता"
आळवणी करत असतात.

दुबळ्यांच्या हाकेला देव ओ देत नसतो
हाल अपेष्टा पाहात पाहात
दगडी मूर्तीत दगड होऊन
अलिप्तपणे पाहात असतो

Friday, 16 September 2016

"शो" म्हटल्यावर---

जगाला हसता हसता
स्वतःचंच हसं होतं.
स्तंभित सारे विचारतात
असं का होतं ?

द्यावं तेच मिळतं
पेरावं तेच उगवतं
प्रकृतीचे नियम हे
त्यांना अपवाद नसतो.

इतरांना फसवता फसवता
माणुस स्वतःच फसतो
भूल थापा देता देता
स्थिती विपरीत होते.
माणसाचं माणुसपण
हरवूनजातं.

आंधळी चाल असते तोवर
सारं ठीक असतं.
"शो" म्हटल्यावर
हार निश्चित असते.
पानं दाखवावी लागतात. 
 :-)

Thursday, 15 September 2016

तरीही जगण्याची हौस असते----

तेच ते बेचव पाणी
रोज रोज प्यायचं.
तेच तेच अळणी जेवण
रोज रोज करायचं.
तेच तेच काम
रोज रोज पुनरावृती यंत्रवत्
कंटाळवाणं जीवन .

दिवस रात्री त्याच त्याच
उन्हाळे पावसाळे
कशातच बदल नसतो
रुटिन सारं
नवी नवलाई नसते
तरीही
जगण्याची हौस असते

मरणप्राय जगणं जगता जगता
एक दिवस मरायचं असतं.
येतात लोक ढाळतात नक्राश्रू
हसण्याचं स्वप्न पाहता पाहता
डोळ्यात येतात अश्रूच अश्रू.

Wednesday, 14 September 2016

तरीही माणुस बेसावध---

बंद डोळ्यापुढे
चालती,बोलती असंख्य चित्रे
रुंजी घालतात,वेडावतात,
वेड लावतात,हसवतात कधी कधी
रडवतात नेहमीच.
भेसुर चेहरे,क्रूर चेष्टा,धुंदडोळे
सारे सारे चक्षुर्वैसत्यम्
क्षणभंगूर,क्षणजीवी
तरीही प्रभावी.

नको ती स्वतःची
रूपं ती दाखवतात.
चिडवतात,डिंवचतात
गोडचिमटा काढतात
भद्रतेतील अभद्रता
सोजवळतेतील बिबत्सता
असत्यातील सत्यता
निष्ठुरपणे दाखवतात
स्वप्ने म्हणतात त्यांना

तिथली दुनिया  खरी नसते
तिला मुळी अस्तित्व नसतं.
तरीही मनाला कधी ती सुखावतात
बऱ्याचदा दुखावतात.

स्वप्ने पाहायची इच्छा नसते
तरी ती पिच्छा सोडत नसतात.
गाढ झोपेचं खोबरं करून
झोप मात्र उडवतात
झोपी गेलेल्या जागा हो
म्हणून ती खुणावतात
तरीही माणुस बेसावध
सावध तो होत नाही
स्वप्ननांना अस्तित्व असतं
हेच समजून घेत नाही.

Tuesday, 13 September 2016

सारा शाब्दिक कूट-----

नावात काही नसतं
तरी केवळ नावासाठी
वितंडवाद, वादविवाद

पूर्वजांचं नाव होतं
शान होती, मान होता
ते खूप शूर होते

त्यांच्या मुळेच
घराण्याच नाव वाढलं
लौकिक वाढला

सारा शाब्दिक कूट
भावा भावात फाटाफूट
द्वेष,विखार,मत्सर

तरीही एकाच रक्ताचे
एकाच वंशाचे
सारे आम्ही !

 सर्वाहून श्रेष्ठ
खोटी शेखी
खोटा अहंभाव
दंभ सारा.

Monday, 12 September 2016

असं मौन बोलकं असतं----

मौनात स्वतःशीच स्वतःचं
बोलणं होतं
 भूतकाळातील  भुतं नाचतात.
सुख दुःखाच्या
कडू गोड आठवणी,
भंगलेली स्वप्ने,
रंगलेल्या रात्री,
यशापयशाच्या
कथा गाथा,
मर्म बंधातील मृदु मुलायम
भावभावना.
जणु सारं सारं
आताच घडलंसं वाटतं
चित्रफीत दृतगतीनं
भिरभिर भिरभिरते.
स्वतःच स्वतःला वेडावतात
स्वतःची अप्रूप रूपे.
असं मौन बोलकं असतं.  

Sunday, 11 September 2016

स्वत्वाचा शोध---

शोध स्वतःचा घेता घेता
स्वत्वच हरवून जातं.
दुस्ऱ्यांच्या स्वत्वाचं
अनायास दर्शन होतं
स्वत्वासाठी संघर्षण,
स्वत्वासाठीच सहकार्य.
सौहार्द,औदार्य,
स्वत्वाचीच रूपे.
अनाचार,अत्याचार,
शोषण भ्रष्टाचार,
अन्याय,दडपशाही
स्वत्वाचीच स्वत्वासाठी
स्वत्वाने केलेली लढाई.
लढता लढता लढाईत
स्वत्वच मात करते.
स्वत्वावरच स्वतःचे
अस्तित्व विसंबून असते

Saturday, 10 September 2016

या काळात----

हृदयाचं  ओठात
कधीच येऊ द्यायचं नसतं
ओठातलं  हृदयात
मुळीच जाऊ द्यायचं नसतं
ओठ अन् हृदयातलं अंतर
कायम ठेवायचं असतं
या काळात
यशस्वी होण्यासठी
हाच नियम पाळायचाअसतो.
हृदयातलं फक्त स्वतः
स्वतःला माहीत असतं
ओठातलं मात्र
सर्वा सर्वांसाठी असतं
लपवा छपवी करून वर
काहीही कुणापासून
लपवता कामा नये
असा साळसूद उपदेश
करायचा असतो.
 

Friday, 9 September 2016

रीत हीच यशस्वी व्हायची---

स्वतःच स्वतःला पाहायचं
विश्लेषण करायचं
सामर्थ्य ,दौर्बल्य हेरायचं
पाऊल पुढे टाकतांना
मर्यादा ओळखायच्या
फुंकून फुंकून वाटचाल
हळुवारपणे करायची
लक्ष्य हेरल्यावर
ते प्राप्तहोईस्तोवर
सातत्यानं चालायचं
चालता चालता अडखळ्यावर
स्वतःच स्वतःला सावरायचं
काटा पायात टोचताच
काढून दूर फेकायचा
प्रवास मात्र थांबवायची
कल्पनाही मनात आणायची नाही
रीत हीच यशस्वी व्हायची.

बिना पेड के बेल प्रेम की -----

बावरी राधा एक अकेली
ढूंढ रही है श्याम गली गली

वृक्ष लताओं को सहलाकर
पूंछ रही है कहॉं कन्हैया
नटनागर बिन सूना सूना
वृंदावन का कोना कोना

बछडे गायें रंभाती है
बन्सी की धुन सुनने व्याकुल
शोक नदी में डूबा गोकुल
डगर डगर पर छायी उदासी

तू नहीं तो मैं भी नहीं रे
मूर्ति नहीं तो छाया कैसी
बिना  पेड के बेल प्रेम की
निराधार श्रीहरि


Thursday, 8 September 2016

नव्या युगाची किमया---

देव कसला? धर्म कसला?
पाप कुठलं? पुण्य कुठलं?
वैद्न्यानिक प्रगतीनं
प्रश्न अनेक उभे केले

माणुस माणुस राहिला नाही
माणुसकीची उदात्त तत्वे
काहीकाही उरलं नाही
कुठेही श्रद्धा नाही,भक्ती नाही

पैसाच सर्वस्व
धडपड सारी पैशासाठी
नको नको त्या खटपटी,लटपटी
परमेश्वर तोच शक्ती तोच

हीच किमया नव्या युगाची

Wednesday, 7 September 2016

दोषैक दृष्टीला---

शोध स्वतःचा घेता घेता
स्वतःलाच हरवून बसलो .
प्रकाशाच्या  शोधात
अंधाराला धरून बसलो.
सुगंधाच्या लोभाने
उकिरडे फुंकत बसलो.
आनंदाच्या डोहात
कधीच डुंबता आलं नाही.
कमळ फुलावं म्हणून
चिखलच चिवडत राहिलो.
चिवडता चिवडता
चिखलाचीच सवय झाली.
जीवनाचा ठाव घेता
हाती फक्त मातीच आली.
 दोषैक दृष्टीला
सगळीकडे दोषच दिसतात.
होश येतो जेव्हां
तेव्हां दृष्टीच हरवून जाते.
आंधळ्याच्या दृष्टीने
सारे जगच आंधळेअसते.


Tuesday, 6 September 2016

तांबडं फुटताच---

हाडांचे सापळे
गुत्यात गेले.
ठ्रर्रा पिऊन,तर्र होऊन
सगळेच्या सगळे
रस्त्यात आले.
ब्यांड च्या तालावर
धूम नाचून
रस्त्यातच कोसळले

लोकांना कणव आली
झोपले सुखेनैव
 समजून
त्यांनी त्यांना
पांघरूणं घातली.

तांबडं फुटताच
कोंबड्याची बांग ऐकून
सगळेच सापळे
धूम पुन्हा गुत्यात गेले
लोकांची पांघरूणं
गुत्तेवाल्याला देऊन
जाम प्याले.