Monday, 17 October 2016

संत सज्जनांचा करावा संग

संत सज्जनांचा
करावा संग
राहावे दंग
संकीर्तनी

संत दाखविती
मार्ग  उद्धाराचा
सुगम सोपा
तुम्हां आम्हां

संत समाधानी
नित्य अवधान
ठेवती  चरणी
 ईश्वराच्या

नाम ईश्वराचे
गोड  गोड घेती
प्रभुशी जोडती
नाते अपुले
२_____२

अनादी  अनंत
आहे भगवंत
जळी, स्थळी त्यासी
पाहाती संत

साक्षात्कार होता
वैराग्य  येते
मन हे रंगते
रंगीं   त्याच्या

देहभाव जातो
ब्रह्मभाव  येतो
उठती  हृदयीं
आनंद तरंग

मागणे  नुरते
भोगणे संपते
सुख शांती लाभते
भ्रांत  जीवा

काम ,क्रोध लोभ
सारे  लोपतात
विरुन जाती
द्वेेष  दंभ

 

No comments:

Post a Comment