Saturday, 1 October 2016

तिथंच घिरट्या मारतो मी---

तसा मी स्मार्ट आहे
हळवं माझं हार्ट आहे
 पोरी म्हणतात डार्क आहे
म्हणण्यात त्यांच्या आर्ट आहे
गोपींना सतावणारा
मी नवा कृष्ण आहे.
मी एक मजनू आहे.
डोळ्यात सुरमा ,वरुन चष्मा
डोक्यावर झुल्पं आत गर्दी
ठमी,यमी,चिमी,कुंदा
यांची शर्यत हाच धंदा
कळे न यातिल
कोण कोणती नटी आहे.
विडी ओढतो,सिगरेट पितो
अफू चघळून,चिलीम ओढतो.
ब्रँडी,व्हिस्की
परदेशीचे वावडे मुळात
गावठी घेतो
तर्र होऊनरस्त्याने जातो
गटारीत लोळण्याची
चुकले,या राज्यात बंदी आहे
गळ्यात स्कार्फ,कपड्यांवर सेंट
माझा वास तिथं वासच वास
तरी मुलींच्या तोंडावरच्या
पावडरींच्या वा स्नोंचा
वास घ्यायचा सोस आहे
काळ्या जाळीत अडकलेल्या
शुभ्र फुलांचा वास घेऊन
हूं म्हणून उसासा टाकणे
हाच माझा व्यवसाय आहे.

वारा बेटा मस्त कलंदर
कुठेहा जातो त्याला ना डर
 नो,प्लिज,स्टॉप,स्टुपिड
कुणी न त्याला हुकूम करतो
मुलायम साड्यातून डोकावणाऱ्या
सौंदर्याचं आकंठ पान करून वर
अय्या, इश्श, अहाहा
म्हणून त्याची मातब्बरी
गातात लैला कधी कधी
गेला कुठं? उकडतंय
म्हणून त्याची प्रतीक्षा
माझी मात्र उपेक्षा

फुले वेचक नव्हे बोचक
गुलाबाची लाल चुटुक
डोक्यावर बसतात
काळे आकडे खुपणारे
केसांना त्या गच्च आवळतात
रंगी बेरंगी चिंधोट्या
खुशाल कपोला चाटून जातात
कर्णभूषणे काळे, निळे,पिवळे,खडे
कानात गोड कुजबुज करतात
काजळ उफ् काळी माती
तेलकट ओली
तीही डोळ्यात जाऊन बसते
मग माझेच वावडे का?

ही सुंद्री की उंद्री की काळी बेंद्री
नीटस बांधा, लोभस चेहरा
की चेहऱ्यावर अगणित अप्सरा
फुटके डोळे,पिचके गाल
काळी काच की टमाटे लाल
उंच, बुटकी की मध्यम
कोकिळा की मयूरी
सर्वात दिसते मला माधुरी

 सिनेमा  थिएटर,बाजार हाट,
नदी किनारा,बस स्टॉप,
कीर्तन, भाषण,श्रावण मास
सारी मला आवडतात
तिथंच घिरट्या मारतो मी
पण
कळत नाही
पोलीस का म्हणून पिच्छा करून
मला हुसकून लावतात

No comments:

Post a Comment