Friday, 28 October 2016

लोकशाहीच्या बुरख्याखाली------

खेडी वेडी
अजूनही मारताहेत गिरक्या
स्वतःभोवतीच.
त्यांच्या गिरक्या संपत नाहीत
दिवस पालटत नाहीत
विकास काही होत नाही
दारिद्र्य,दैन्य,अद्न्यान,
अंधश्रद्धा,बेकारी, बेरोजगारी
यांचाच धुडगुस
हैदोस यांचा--
सट्टा,दारू,जुगार
वेश्यांचा नंगा नाच
तमाशातील गण गौळणी
यांच्याच भोवती अजूनही
गिरगिर गिरगिर
फिरताहेत ती
दुःख,दैन्य त्यांचं संपत नाही
जात, धर्म, पंथांचं जोखड
निघत नाही.
स्वातंत्र्य,समता, बंधुत्व
या तत्वांचा ध्वज फडकत नाही.
लोकशाहीच्या बुरख्या खाली
पूर्वीची सरंजामदारीच
आजही टिकून आहे.

Thursday, 27 October 2016

हाच त्यांचा सामुहिक उपक्रम असतो---

सायंकाळी झोपडीत
धूम गर्दी असते
 स्वस्त दारूसाठी 
उद्ध्वस्त मनाचे,
बेपर्वा,बेदरकार,
बेफिकिर,तरूण
तिथंच झुंबड करतात

मधुशाला क्षणोक्षणी
बदलते रंग.
पिणारांना भान नसते
प्रत्येक जण
पहिल्या धारेचा
जोरदार माल मागतो.

जळजळ घशाजवळ
चिमुटभर मिठाची पुड
बोंबिलाचा तुकडा
शेव चुरमुरे
तिखट हिरव्या मिरच्या
कांद्याच्या उग्र फोडी.

प्रत्येक जण  येतांना
खूपखूप घाईत दिसतो
एकदा बैठक बसताच
आता माझी
एवढं थोडं
गोड आग्रह.

झिंगतात सारे
विसरतात घरे दारे
पत्नी पोरे
तर्र होऊन
लोळतात तिथेच.

मनं त्यांची सैल होतात
भराभर शब्द येतात
हातही उचलले जातात
बाचा बाची शब्दाशब्दी
उद्धार जन्मदात्या आईचा
बापाचा,इतरांचाही करतात ते

हाच त्यांचा
सामूहिक उपक्रम असतो
यातच त्यांना
पुरुषार्थ,पराक्रम दिसतो!

एकच तू करायचं-----

तू म्हणशील तर----
काहीही करीन मी
शिंगं आणीन सशाला
कंठ आणीन कावळ्याला
हवं तर----
गाढवालाही करीन शहाणा
बैलांना करीन राजे
तू सांग--
सांग अन् पाहा
करतो काय गमती जमती
कुणी म्हणे प्रियेसाठी
आणलं होतं आईचं काळीज
मी मात्र तुझ्यासाठी
आणीन अंड्याची भजी
हवंतर चतुरिके,
कोंबडीला घालीन कंठस्नान
वरून खायला देईन पान
पण गडे
एकच एक
एक तारीख
एकदाच येते
एका ग महिन्यातून
तेव्हां---
एकच तू करायचं
काढून मनातली खुळं
अहो, आणायचं एवढंच
एवढंच सांगायला विसरायचं
ऐकलं का ?

Tuesday, 25 October 2016

तंत्र व यंत्र युगाची हीच का प्रगती ?

इथं तिथं सर्वत्र
अशाच मुद्रा
वरुन हसऱ्या
आतून दुखऱ्या

मनातलं कुणी सांगत नाही
सांगतो तसं असत नाही
लेप मात्र सोनेरी,तकलुफी
बेगडी

जीवाला जाळणारे,छळणारे
असतात बोल
माधुर्याचं कवच लेवून
येतात पुढे

अशाच मुद्रा,अभद्रा
इथं तिथं सर्वत्र
ईर्ष्या ,द्वेष, असुया
यांचीच पिलावळ
वाढतेय सारखी
लपवालपवीच साऱ्यांची

प्रेम,स्नेह,सहकार्य,
गेलं कुठे ?
कुणास ठावूक?
क्षणात,विनाविलंब,नचुकता
मुद्रेतून होतात प्रगट
भाव सारे़

करावीशी वाटते घृणा
मन मात्र म्हणतं
करावी दया,करुणा
शक्य नसेल तर उपेक्षा
हाच उरतो एकमेव उपाय

हसरं ,निरामय,सर्वांना
हसवणारं,सुखवणारं
माणसांचं विश्व गेलं कुठे?
कळेना कुणाला कुणाला
उद्योगी तंत्र व यंत्र युगाची
हीच का प्रगती,सभ्यता,
नव मानवता?


Monday, 24 October 2016

बाल्य ----

हसतात मुले
काट्यात फुले
क्षणोक्षणी
कांती खुले
निष्पाप
निर्मोही
स्वानंदी
स्वच्छंदी
सुखवणारी
हसवणारी
लोभस.

निखालस
मऊमऊ
गोड स्पर्श
फुलांचा
मुलांचा
सहवास
सुखाचा.

बाल्य निरागस
क्षणभर हसणं
क्षणभर रुसणं
क्षणात रडणं
नको ते मागणं
आहे ते फेकणं
नाही ते मिळताच
किंचित हसणं
क्षणार्धात---
दूरवर भिरकावणं
हातातलं खेळणं

Sunday, 23 October 2016

मी-- मीच--माझ्यासमही मीच

मी---
मीच---
माझ्या समही मीच
स्वयंभू
स्वतंत्र
स्वाधीन संपूर्ण व्यक्तीमत्व!
सर्वात उठून दिसणारं

लोभस उठणं बसणं
बोलणं चालणं
सारं काही वेगळं
माझं मीपण

कुणीही कधीही
नाही केली बरोबरी
अनंत जन्म झाले तरी
मी---
मीच---
माझ्यासमही मीच .

Saturday, 22 October 2016

रोज रोज मरून मी-----

जगतो ?
छेः रोजच मरतो
हजारदा.
कसलं जिणं
लाजिरवाणं,लांच्छनास्पद
बापुडवाणं.
नाचतात पुढे पुढे रोजरोज
यमदूत जिवंत
भिववतात,भितो मी
उंदरागत लपतो बिळात
जगण्याच्या भीतीनं
निरर्थक खटाटोप.
कळतं
कळतं पण वळतं कुठे?
रोजरोज मरून मी
अजूनही जिवंतंच
हेच आश्चर्य!
--

Thursday, 20 October 2016

मी क्षणजीवी---

मी कण आनंदाचा
मी क्षण आनंदाचा

मी न कुणाचा
कुणी न माझे
तरीही मी सर्वांचा

कणा कणाने
विश्वही बनते
मी विश्वाचा निर्माता

क्षणा क्षणाने
विश्व बदलते
मीही बदलतो

एकच क्षण
कधी स्थीर न असतो

मी क्षण जीवी
तरीही विजयी
चिरंजीव पण

ठसा राहातो
माझ्या अस्तित्वाचा

तहान बिलकुल भागत नाही---

झुळझुळ झुळझुळ
जीवन धार मंजुळ नाद
       तृषार्त मी
सरसर सरसर
गार पाणी पायाखालून
        वाहातंय
ओला ओला पाणावलेला
काठावरला दगड काळा
शून्य मन, नजर शून्य
        शुष्क ओठ
तहानलेला जिवडा वेडा
धारेकडेच पाहातोय
ओंजळ धारेत जात नाही
ओठ ओले होत नाहीत
आग काही थांबत नाही
तहान बिलकुल भागत नाही

Wednesday, 19 October 2016

सोनपंखी डोळे माझे---

तुझं बोलणं---
तुझं बोलणं मधाळ
हृदयाच्या गुंफेतून
येतात बोल
न्हालेले अमृतात.
सर्वत्र भिरभिरतात
रंगी बेरंगी,स्वानंदी
शब्दरूपी पांखरं.

जिवडा माझा रंग वेडा
रंग हाती येत नाही
गंध मात्र दरवळतो
पळपळ पळतो मी
बेबंद होऊन मागे मागे
धावणं काही संपत नाही.
हीच तुझी शिवाशिवी,
लुकाछिपी.

लुब्ध मी,स्तब्ध तू
रिक्त मी,पूर्ण तू
तृप्त तू, अतृप्त मी
तहान अजून भागत नाही

तू मात्र बोलतोस
बोलता बोलता अचानक
बदलतो सूर.
होतोस दूर

सोनपंखी डोळे माझे
शोधतात तुला
तू हाती येत नाहीस
शोध काही थांबत नाही

शोधता शोधता डोळेच
कुठेतरी हरवतात
गमावून अस्तित्व
डोळे तूच होतात
अगम्य बोल बोलतात.

Tuesday, 18 October 2016

तुझं हसणं----

तू हसतोस तेव्हां----
लाख लाख चांदण्या हसतात.
तुझं हसणं दिलखुलास
सर्वांना सुखवणारं,फुलवणारं
हृद्तंत्रीच्या तारा छेडणारं

हसणं तुझं कळतं ज्याला
तोही  हसतो,
कळत नाही ज्याला
,तोही हसतो.
असं हसणं निर्हेतुक,
जिवंत,नव जीवन देणारं
तुझं हसणं सुगंधी

माझं हसणं तकलुफी,
बेगड लावलेलं,
इतरांना छळणारं,झोंबणारं,
माझं हसणं कांटेरी,विषारी

क्षणोक्षणी हसून

ताऱ्यातून वाऱ्यातून,
चांदण्यातून ,फुलातून,
मुलामुलीतून
,गीतातून, नृत्यातून
 नाट्यातून,संगीतातून
नदी नाल्यांच्या प्रवाहातून
ढगातून,कळ्यातून ,
तळ्याच्या मंद नादातून
हसवतोस सर्वांना

हीच तुझी नवलाई
तू अशरीरी
मी मात्र ---
शरीरातील शिरशिरी.

Monday, 17 October 2016

अहं छे,सोsहंचा साक्षात्कार होतो

डोळे तुझे स्वच्छ आरसा
निर्लेप अलिप्त.
दाखवतो मला सर्वांना
खरं आपलं रूप सुप्त.
काम,क्रोध,मद,मोह
तुला पाहून होतात गुप्त.
पापण्यांच्या बांधांचे बंध तोडून
वाहातात स्नेह नद्या सुप्त.
डोळ्यातून माझ्या
तुझ्याकडे पाहाता,पाहाता.

तुझ्या नजरेतून
पाझरणाऱ्या स्नेहाचं पान करताच
अघटित घटना घडून येतात
अद्भूत रासायनिक क्रियेने
शारीरिक,मानसिक,दृश्य,अदृश्य
सारे रोग
धूम पळून जातात

निर्मल शरीरातून तुझाच नाद
घुमू लागतो
अहं छे ,सोsहंचा साक्षात्कार होतो.

संत सज्जनांचा करावा संग

संत सज्जनांचा
करावा संग
राहावे दंग
संकीर्तनी

संत दाखविती
मार्ग  उद्धाराचा
सुगम सोपा
तुम्हां आम्हां

संत समाधानी
नित्य अवधान
ठेवती  चरणी
 ईश्वराच्या

नाम ईश्वराचे
गोड  गोड घेती
प्रभुशी जोडती
नाते अपुले
२_____२

अनादी  अनंत
आहे भगवंत
जळी, स्थळी त्यासी
पाहाती संत

साक्षात्कार होता
वैराग्य  येते
मन हे रंगते
रंगीं   त्याच्या

देहभाव जातो
ब्रह्मभाव  येतो
उठती  हृदयीं
आनंद तरंग

मागणे  नुरते
भोगणे संपते
सुख शांती लाभते
भ्रांत  जीवा

काम ,क्रोध लोभ
सारे  लोपतात
विरुन जाती
द्वेेष  दंभ

 

Saturday, 15 October 2016

विधानसभेत,लोकसभेतही---

विधानसभेत,लोकसभेतही
शब्दांचा खेळ चालतो.
निकोप चर्चा दुर्मिळ
विरोधासाठी विरोध
माझेच म्हणणे खरे
म्हणून
मतांसाठी जनभावना
भडकावल्या जातात
लोकशाही तत्वांना
मूठमाती दिली जाते
लोकहिताचा बुरखा
पांघरून राष्ट्रहितालाही
तिलांजलि दिली जाते
चतुर नेते शब्दफेकीत
तरबेज असतात
पक्षहितासाठी
राष्ट्रहिताची उपेक्षा
केली जाते
मतांवर लक्ष ठेवून
छुप्या चाली
चालल्या जातात.
मोर्चे काढले जातात
संकुचित विचार
प्रसृत  करून
जनभावना भडकावल्या
जातात
अंतस्थ हेतू केवळ व्होट ब्यांक
वाढवणे हाच दिसून येतो
आम्ही खरे देशभक्त म्हणून
स्वतःवरून आरत्या
ओवाळल्या जातात

बेपर्वा नेत्यांची फौज सर्वत्र
वाढते आहे
कधी नव्हे एवढी जनजागृती
व्हायला हवी
नेत्यांच्या उक्ती व कृतीची
चिरफाड करून
सत्य काय ते समजून घ्यायला
हवं
अन्यथा विषमता,दारिद्र्य
बेकारी ,बेरोजगारीची
बेसुमार वाढ होतच राहील. 

Friday, 14 October 2016

म्हणून सारे म्हणतात---तुझाच अंश मी

तू मी,मी तू,
खरा तू, खोटा मी
खरा खरा,खरा मी
खोटा खोटा,खोटा तू
तू मी,मी तू
दोघेही खरे
खरे खरे खरे दोघेही
तू मी ,मी तू
दोघेही खोटे
खोटे खोटे खोटे दोघेही
तू मी,मी तू
न उकलणारं कोडं
अगम्य,अतर्क्य
तरीही ---
माझ्या तुझ्या
तुझ्या माझ्या संबंधात
अनेक
तर्क वितर्क
कुतर्क
मला तुला,तुला मला
अजून कुणी जाणलं नाही.
सगळेच खोटारडे
बहरूपी तमासगीर
हवं ते बोलत नाहीत
खरं खोटं ,खोटं खरं
सारीच गंमत
गु्ंता विचित्र,
न सुटणारा,अनादि अनंत
तू मी मी तू
साराच काथ्याकूट
दोघेही अलिप्त राहून
पाहातोय गंमत तमाशा
खरं म्हणजे तू मी ,मी तू
खरे राजकारणी
हवं ते बोलतो,नको ते करतो
बोलतो तसं करत नाहीत
करतो तसं बोलत नाहीत
दोघांची एकच रीत
तऱ्हा एकच.

म्हणून सारे म्हणतात
तुझाच अंश मी.

Thursday, 13 October 2016

वाs ,मम्मी,वेल डन्----

भरत खुळा रामाचा भाऊ
नको म्हणे मज ते सिंहासन
त्यावर रामाचा अधिकार
म्हणून आईचा धिक्कार
माता नच तू वैरिण माझी
असे म्हणाला तो जननीला
आजचा भरत म्हणालाअसता---
वाs खूब,फार छान
मम्मी,गुड्,वेल डन्
महान तू महान मी
दशरथ गेला ठीक झालं
एक दिवस मरायचाच
मरण टळलं कुणाला?
होता हा म्हातारा
गीतेत सांगितलंय
जन्म त्याला मृत्यू निश्चित
हवं तर ----
तू सांग
करीन छळ कौसल्येचा,
सुमित्रेचा इतरांचा
तुझ्यासाठी कुणालाही
देईन काढून राज्या बाहेर
स्रियश्चरित्रम् कळलं आज.
माझी तू महा देवता
मागेन हेच देवापाशी
जन्मोजन्मी
हीच आई दे मजशी
हित माझं पाहाणारी
भलं बुरं चिंतणारी
माझ्यासाठी इतरांचे
न्याय्य हक्क लाथाडणारी"


आपल्याच तोंडात मारून घ्यावं--लोकांना वाटलं

त्यानं पाहिलं तिच्या कडे
तिनं पाहिलं त्याच्या कडे
गुलाबी गाल,हास्य रेखा
तांबुस ओठ,ओघळले मोती
कबुतरं दोन मीलनोत्सुक---लोकांना वाटलं
अवखळ वारा,मिश्किल पदर
फडफड फडफड फडफडणं
रुमालाचं रागावून दूरदूर पदर
प्रथम ग्रासे मक्षिकापातः --- लोकांना वाटलं

तो जवळ,ती जवळ
हातात हात
लपेटणार वेल झाडाशी----लोकांना वाटलं
सुटली पुडी,सैल दोरा
भेळ चिवडा
कांद्याच्या फोडी
वाsछान बहोत खूब----लोकांना वाटलं
त्याच्या हाती चिवडा
तिच्या हाती चिवडा
खुदकन हंसणं
त्याचं साथ देणं
एकमेकांना भरवणं
घास देणं
डाव खूपच रंगणार----लोकांना वाटलं

तेवढ्यात---
एक चिमुरडी,बिजली जणु
आली.पांढऱ्या साडीवर
मातकट नक्षी  ,झाली
विस्फारलेले डोळे
रोखलेल्या भिवया
कपाळावर जाळं
रंगाचा भंग  झाला----लोकांना वाटलं
मिचमिच मिचमिच
ठराविक हातवारे
थोडीशी खसखस
मरगळलेल्या माना
मागेच राह्यल्या
चेहरे आंबट
काडे चिराईत प्याल्या गत

कानावर शब्द------
बॉंब स्फोट
"मामांची पाठ
शिलकेतला कागद कोराच का ठेवायचा?"
आपल्याच तोंडात मारुन घ्यावं--लोकांना वाटलं

Wednesday, 12 October 2016

गुलाबी पत्र---

तरल वाऱ्यानं
आणला चुरगाळलेला कागद एक.
रंग गुलाबी,छोटा कपटा
गरगर फिरत पडला दाराशी एकाकी.
दुपारची वेळ.कडक ऊन.
उगीचच गेले डोळे फिरायला बाहेर.
तिथून निघाले तीक्ष्ण शर दोन.
शिरले डोळ्यात.
मिटले गपकन.

तरळल्या अनेक मुद्रा क्षणात त्या.
असंख्य फिरलीत गरगर गुलाबी पत्रं
निळी,फिक्कट,काही पिवळी
,हलक्या रंगाची.
अक्षरं मोतीदार.

कमलाक्ष बोलके मिचकावले कुणीतरी
काळ्याभोर पापण्यातून
ठिबकणाऱ्या शाईनं लिहिलेलं
खारट पत्र शेवटचं आठवलं.
स्तंभित मी.

उचलला कपटा न् पाहिलीत अक्षरं
कसलं काय?
धुंद वास.
कुठलासा उग्र दर्प
परदेशी अत्तराचा
तीनचार सोनेरी केस
बस् काहीच नाही.

कुणीतरी तारुण्याच्या उन्मादात
मदमत्त होऊन
गाठली असेल
 मस्तानी.
काळानं कठोरपणे
कालवली असेल
माती जेवणात त्याच्या.
आठवणींची गोड खूण
सप्रेम भेट
आज मात्र वाऱ्यावर सैरभैर
तिकडे तो धंडाळत असेल कोपरा न्
कोपरा .

इकडे----
अचानक मनाचे उघडलेत कप्पे सारे
आठवला सोनेरी काळ
पिसं लावून निघून गेलेला दबरवर
असाच या कपट्या सारखा
गुलाबी, शराबी, डोळ्यांची
आठवण ठेवून मागे
मनहूस बेटा !

Monday, 10 October 2016

रोज रोज चांदण्यात-----

रात्र एक सुगंधी
चांदणं पिठोरी
उन्मादक.
मंद मंद शीत वात.
मऊ पीस तुझी शेज
डोळ्यास डोळा
अतृप्त
दूरदूर एक फूल
हलकेच साद
किनरी हाक
प्रतिसाद निबोलका

तू मुग्ध
मी अबोल
स्पर्शास स्पर्श
चिमटीस चिमटी
ओठात ओठ
बंद डोळे

श्वासात श्वास
चढ उतार
धुंद ठेका
मंद ताल
द्रुत लय
काही क्षण
एक रूप
तू मी
मी न् तू

गोड शिरशिरी
आपाद मस्तक
मधु सिंचन
आगळं सुख
परमोच्च तृप्ती

रोज रोज
चांदण्यात
तू मी
मी न् तू
दोघेच खेळगडी
धुंद होऊन
नव नवीन
खेळतो खेळ.

पाहून तिचा चेहरा----

तिरका भांग,तिरळी बाहुली
तिरकस नजर,तिरपी चाल
तिरीमिरी नेहमीचीच
मिरी वाटते डोक्यावर
याच्या त्याच्या तीच ती
तिरसट,तिखट,तिलोत्तमा

तिला वाटतं.तीच ती
एकमेवाद्वितीयम्
"तीन चोक तेरा
फिर क्या?
खाक"

पाहून तिचा चेहरा
फिरतो जीव माघारा.

स्थिरचित्त,आसनस्थ, ध्यानस्थ, पद्मपाणि, वज्रपाणि------

अजिंठा---
तरल स्वप्न
पाषाणातलं.
मधुर संगीत
धुंद गीत
धुंदीतच गायलं
त्यांनी _कलाविदांनी
हळुवार मन
तरल भाव,
दृढश्रद्धा
समर्पित वृत्ती
तिथं काळ्या पाषाणात
आकारली बुद्ध नगरी.
नितांत सुंदर
भव्य शिल्प
बोलकी चित्रे
नाना रंग
उठावदार,आकर्षक
कालौघात अजूनही
मूळचं सौंदर्य जपणारी
दया, करुणा,प्रेमाचा
आर्त संदेश देणारी
चित्रे ही.
बुद्धाच्या अनंत जन्मांच्या
 अगणित लीला,जातक कथा
सांगून जातात ती.
विस्मित मी स्मित पाहून
कालातीत भाव मुद्रा
आगळ्या,वेगळ्या
स्थिरचित्त, आसनस्थ,
ध्यानस्थ,पद्मपाणि,वज्रपाणि.


Sunday, 9 October 2016

नेत्यांची मात्र चंगळ असते

सत्तेचा खेळ विचित्र असतो.
आजचा शत्रू उद्याचा मित्र
असतो.
आजचा मित्र उद्याचा शत्रू
असू शकतो
शत्रूचा शत्रू आपला मित्र
हीच नीती वापरून
लढायचं असतं.

नेत्यांची नेहमीच चंगळ असते
जनतेच्या पोळीवरचं तूप
नेते  व त्यांचे पंटरच लांबवतात
जनतेला मात्र
झुणका भाकरीवरच
भागवावं लागतं

निवडणुुकीची गंमत असते
कालचा पराभूत आजचा
विजयी असतो.
बिचारा मतदार मात्र
त्याच त्या भूलथापांना
भुलत असतो
तो स्वतः फसत असतो.
नेत्यांची मात्र चंगळ असते.

निवडणुक काळात
मत मलाच द्या म्हणून
घरोघरी प्रार्थना,
 प्रसंगी हातजोडणे,
पाया पडणेही.
विविध प्रलोभने
कर्तुम अकर्तुंम शक्ती
माझी तुमच्या कल्याणा साठी
याचना,वचने.
निवडणुक संपल्यावर मात्र
वंचना,उपेक्षा.
मतदाराला समजत नाही असं का
होतं ?
कुणी कुणाचा वाली नाही
हे  खूपच उशिरा समजतं
समजतं तेव्हां वेळ गेलेली असते
चुकीच्या माणसाला मत देऊन फसलो
याची त्यालाच नव्हे तर
सर्वांना जाणीव होते.

जी हॉं मैं विद्यार्थी हूं

जी हॉं ,मै विद्यार्थी ही हूँ

दिमागपोशी का क्या कहूँ?
फैशन का अंधा फैशनपसंद
फैशनेबल पुतला ही हूँ
क्या कहा लक्ष्य कहाँ?
कहनेवाले ने खूब कहा
कितना बडा है जहाँ
वक्त की कुछ कमी नहीं
फिक्र खाक बने तो क्या?
मैं अलमस्त मनमौजी,फक्कड
किताब उफ् सफेद भैंस
उसके बाल अक्षर मच्छर से
डसे ना लहू चूसे ना
सो अनभ्यास की जाली लगए बैठा हूँ

बडे सबेरे ऊठ, बैठ
गोता लगा ग्यान सागर में
कहते बूढे अनपढ अरसिक
क्या वे समझते मुर्गा मुझे?
करू?कुकडू कू कुकडू कू

सबेरे की मस्त हवा गहरी नींद
मीठी रूठी,छोड
कहते,राम राम रटना
राम करे इन्हे न पडे
कहींआखरी राम कहना!

मैं स्वच्छंदी,अनंत फंदी
केवल जीना जानता हूँ
सफेदपोश रहोनहीं
बगुला बनकरजियो नहीं
वा भई, खूब कही


शुचिता,पवित्रता,सभी सफेद
तो मैं भी सफेद,,मेरा विद्यालय सफेद
इसमें मेरी गलती क्या ?
जीवन तेरा रंग कैसा ?
जिसमें मिलाया वैसा
मैंभी अपने राम की
डफली बजानाजानता हूँ


नकल की दुनिया,अकल की भैंस
आज उसकी चलती हैं
सब कुछ यहाँ नकली है
मैं बेचारा! पानी में रह फिर भी न्यारा
कहो कैसे रह सकता हूँ?

अतीत क्या था? जानो
भविष्य उज्वल बनाओ-कहते
अतीत पत्थर अचल पडे है
उनमें शान न कुछ जान
मेरी शान तो देख लो

मानता हूँ सारा जहान
जैसे फूलों की मुस्कान
भौँरा बन फिरू नहीं,
क्या मधुप मैं बनूं नहीं?

चाँद सितारोंपर तहखाने
ढूंढ रहे विग्यानी स्याने
मैं तो केवल चित्र तरिका
चित्र सितारे,चहरे,मुखडे,,
कुछही धडकने,प्यार की बातें,
कुछ तराने, हँसोड गाने
जिनका अर्थ कोई न जाने,
खोज उनकीही करता हूँ
जी हाँ,हाँ,हाँ मैं विद्यार्थी हूँ
नये जमाने का नया विद्यार्थी हूँ

Friday, 7 October 2016

असेच सारे चालत असते----

आयाराम,गयाराम
यांचे कुणाला
सोयरसुतक नसते
निवडणुकपूर्व
तिकिटासाठी
भल्या भल्यांचे
नाटक असते

खुनी,भ्रष्टाचारी
यांना दिवस बरे आले
सारेच पक्ष निवडणुकीत
त्यांची मदत घेतांना
दिसतात.

निवडणुक लढाई असते
तीत सारं क्षम्य असतं.
तत्वच्युती ,अधःपात
लक्ष्यापासून  दूर जाणं
तत्वांना तिलांजली देणं
सारं शिष्टसंमत असतं
विजयासाठी हवं तसं,
स्वतःला फिरवणं
हीच शिस्त असते.

जनमताचा अर्थ
सोयीनुसार लावला जातो
कौल आमच्याच
बाजूचा म्हणणे
सारे खोटेअसते.
खोटेच दडपून खरे आहे
असेच सारे
सांगत असतात.

Thursday, 6 October 2016

त्यांचीच चंगळ !!!

तेल, तूप,तिखट, मीठ
सारं सारं महाग झालं
माणूस मात्र स्वस्त
यालाच म्हणायचं विकास
बाकी सर्व झकास
सामान्यांचं रोज रोज
 मोडतंय कंबरडं
हंबरडा त्यांचा
कुणी ऐकत नाही
त्यांचा कुणी वाली नाही
स्वप्न रूपी गाजरं खाऊन
 पोटं कुणाची भरत नाहीत
बेकारी, बेरोजगारीनं
आधीच त्रस्त
घोटाळे,फसवणूक करून
सामान्यांच्या  डोळ्यात
धूळ चारून
अनुदाने लुटणारे
भ्रष्टाचारी अधिकारी,नेते
मात्र मस्त.
त्यांचीचं चंगळ!!!

सामान्यांच्या सुख दुःखाचे
नेत्यांना देणे घेणे नसते
फसवी अश्वासने देऊन
मत पदरात पाडून  घेणे
एवढेच त्यांचे लक्ष्य असते

Wednesday, 5 October 2016

सत्तासुंदरीची मोहिनी' अजब असते

साठी बुद्धी नाठी म्हणून
सामान्यांचे  हंसे  होते
साठी नंतरच नेत्यांचे
नेतृत्व पक्व  होते.

डावपेचात हे दृढ्ढाचार्य
चतुर असतात.
सत्ता सुंदरीच्या प्राप्तीसाठी
नको ते उपद्व्याप करतात.

सत्तासुंदरीची मोहिनी अजब
असते.
साठी उलटलेलेही तिच्यासाठी
रिंगणात येतात.
चितपट झाले तरी
त्यांना काही वाटत नसते
पु न्हा एकदा प्रयत्न करू
म्हणून
शड्डू ठोकत असतात

Tuesday, 4 October 2016

सत्ते साठी----

पैशानं सत्ता मिळते
सत्तेनं पैसा मिळतो
सत्ता पैसा पैसा सत्ता
या चक्रातच नेता फिरतो.

घोषणा नव्या नव्या
द्यायच्या असतात
निवडणुका झाल्यावर
साऱ्या विसरायच्या असतात.

सत्तेसाठी लांड्या लबाड्या
हीच   नीती  हीच  रीती

खुर्चीसाठी हवे ते
करायला जो तयार असतो
हवंतर पुन्हा पुन्हा
पक्ष बदलायला राजी असतो
पुरोगामी  सुधारक नेता म्हणून
तोच ओळखला जातो.


Monday, 3 October 2016

अलीकडे-------

दिलाशब्द पाळायचा नसतो
पदोपदी फिरवायचा असतो
कला  ही  साधते  ज्याला
तोच   नेता  बनू शकतो

दिला शब्द  पाळायची
जुनी  रीत  जुनी  झाली
शब्दासाठी  प्राण द्यायची
संस्कृती  नष्ट  झाली.

खाणं पिणं मौज मजा
हीच अाजची संस्कृती
सभ्यता   शहाणपण
श्रीमंती    मोठेपण

शाकाहार  मिताहार
संयम  सदाचार
हेच मागासलेपण
हाच  अधःपात

स्वप्नात दिलेलं वचन
हरिश्चंद्रानं पूर्ण केलं
अलीकडे दिलेलं वचन
स्वप्नातही पूर्ण करत नाहीत.

पित्याच्या वचनासाठी दाशरथी राम
चौदा वर्षे आनंदाने वनात गेला
अलीकडे चौदा तासात चौदा वेळा
दिलेली वचने बेलाशक बदलली जातात



व्यर्थ सारं ---------

गांधींनी साधेपणाचे पाठ दिले
अनुयायी बेरकी.
साधेपण धर्म आपला.
संस्कृती आपली
हेच जनतेला सांगत राह्यलले.

स्वतःमात्र
खा,प्या,मजा करा
खिसे?छे
तिजोऱ्या स्वतःच्या
भरत राहा
हाच जीवनधर्म
जगतराह्यले
उक्ती कृतीत
मेळ नसतो.
हाच प्रत्यय
देत आले.

 सत्य,शिव,सौंदर्य,
लोपलंं सारं.
असत्य ,अशिव, असुंदर,
टरारतंय
इथं,तिथं,सर्वत्र.

अनाचार,अत्याचार,
दुराचार,भ्रष्टाचार
शिष्टसंमत व्यवहार
व्यर्थसारं.
अनर्थाची पिलावळ
वाढतेयं बेसुमार.



Sunday, 2 October 2016

साधकाचे ईप्सित----

मना मना नाम घे
नामात हो दंग
धुंद हो
होऊ दे मनाची
बुद्धीची
भगवतीशी एकरूपता
घेता घेता नाम
जाईल मनातून काम

काम जाताच
शुद्ध होईल मन
तेच खरे नमन
खरे समर्पण

अहंचे विस्मरण
बिन बोभाट
बिन तक्रार
बेलाशक
यात्रा तुझी
होईल सफल
अहंचे विस्मरण
साधकाचे ईप्सित

Saturday, 1 October 2016

तरंग हवेत जावेत उंचच उंच

असावं घर एक छोटंसं
गर्दी पासून दूरदूर
एकाकी टेकडीवर.

पूर्वेला कडुनिंब छायादार
पश्चिमेला उंचच उंच
नारळाची झाडे चार
आडोशाला अडुळसा
तुळसी वृंदावन
आजुबाजूला
फुलावीत फुलंच फुलं
धुंद करणारा केवडा
निशिगंधाचे कंद काही
कळ्या मोतीदार मोगऱ्याच्या
सुमंद गंधवाही
वाऱ्यालाही गंधित करणाऱ्या

 उठावं घर
किलबिलाटानं पांखरांच्या
दुपारच्या रणरणत्या उन्हात
एकाक्षाची कावकाव
बिन दारांचं,बिन भिंतींचं
निळं छत नक्षीदार
पाचूंची पखरण खाली
मखमली गालीचा
लवलवणारा,सुखावह
पडताच त्यावर
शरीरावर उठावेत रोमांच
सुषुप्ती घ्यावी खुर्चीतच

मावळतीचे रंग पाहून
तृप्त झालेल्या डोळ्यांच्या
मिटाव्यात पापण्या.

चांदण्यांचा लपंडाव
पाहण्यासाठी
मधुनच उघडावीत नयनदलं
आकाशपुष्प शुभ्रशीतल
तरंगावं नील सरोवरात

दूरवर कुणीतरी
  छेडाव्यात तारा
प्रस्फुट ओठातून
पडावीत बाहेर
हलके हलके
नाजुक पुष्पे नादवाही.
तरंग हवेत जावेत
उंचचउंच
निःशब्द पसरलेल्या
अगाध अवकाशात.

तिथंच घिरट्या मारतो मी---

तसा मी स्मार्ट आहे
हळवं माझं हार्ट आहे
 पोरी म्हणतात डार्क आहे
म्हणण्यात त्यांच्या आर्ट आहे
गोपींना सतावणारा
मी नवा कृष्ण आहे.
मी एक मजनू आहे.
डोळ्यात सुरमा ,वरुन चष्मा
डोक्यावर झुल्पं आत गर्दी
ठमी,यमी,चिमी,कुंदा
यांची शर्यत हाच धंदा
कळे न यातिल
कोण कोणती नटी आहे.
विडी ओढतो,सिगरेट पितो
अफू चघळून,चिलीम ओढतो.
ब्रँडी,व्हिस्की
परदेशीचे वावडे मुळात
गावठी घेतो
तर्र होऊनरस्त्याने जातो
गटारीत लोळण्याची
चुकले,या राज्यात बंदी आहे
गळ्यात स्कार्फ,कपड्यांवर सेंट
माझा वास तिथं वासच वास
तरी मुलींच्या तोंडावरच्या
पावडरींच्या वा स्नोंचा
वास घ्यायचा सोस आहे
काळ्या जाळीत अडकलेल्या
शुभ्र फुलांचा वास घेऊन
हूं म्हणून उसासा टाकणे
हाच माझा व्यवसाय आहे.

वारा बेटा मस्त कलंदर
कुठेहा जातो त्याला ना डर
 नो,प्लिज,स्टॉप,स्टुपिड
कुणी न त्याला हुकूम करतो
मुलायम साड्यातून डोकावणाऱ्या
सौंदर्याचं आकंठ पान करून वर
अय्या, इश्श, अहाहा
म्हणून त्याची मातब्बरी
गातात लैला कधी कधी
गेला कुठं? उकडतंय
म्हणून त्याची प्रतीक्षा
माझी मात्र उपेक्षा

फुले वेचक नव्हे बोचक
गुलाबाची लाल चुटुक
डोक्यावर बसतात
काळे आकडे खुपणारे
केसांना त्या गच्च आवळतात
रंगी बेरंगी चिंधोट्या
खुशाल कपोला चाटून जातात
कर्णभूषणे काळे, निळे,पिवळे,खडे
कानात गोड कुजबुज करतात
काजळ उफ् काळी माती
तेलकट ओली
तीही डोळ्यात जाऊन बसते
मग माझेच वावडे का?

ही सुंद्री की उंद्री की काळी बेंद्री
नीटस बांधा, लोभस चेहरा
की चेहऱ्यावर अगणित अप्सरा
फुटके डोळे,पिचके गाल
काळी काच की टमाटे लाल
उंच, बुटकी की मध्यम
कोकिळा की मयूरी
सर्वात दिसते मला माधुरी

 सिनेमा  थिएटर,बाजार हाट,
नदी किनारा,बस स्टॉप,
कीर्तन, भाषण,श्रावण मास
सारी मला आवडतात
तिथंच घिरट्या मारतो मी
पण
कळत नाही
पोलीस का म्हणून पिच्छा करून
मला हुसकून लावतात

तू होतीस, त्या रात्री होत्या----

त्या रात्री
त्या रात्री कसल्या
ती धुंदी  केवळ
ती बेहोशी
तरल,विरल

त्या रात्रींना वाचा नव्हती
होते केवळ हास्यतुषार
त्या रात्रींनाशब्दही नव्हते
होत्या केवळ नजरा फेकी

त्या रात्री भयाण,भीषण !
कराल जिव्हा  ! !
तप्त लाव्हा.

त्या रात्रींना अंगे नव्हती
होत्या केवळ नग्न वासना
त्या रात्रींच्या भेसुर मुद्रा
त्या अभद्रा.
रोज नाचती,उगीच छळती

कळे न केव्हां उपरती होईल ?
त्या रात्रींची खूण न राहिल
कुठे न राहिल मागमूस
तू होतीस
त्या रात्री होत्या