Thursday, 25 August 2016

तुझ्या दर्शनाने----

सोनियाचा दिन गुरुकृपा झाली
माय माऊलीने दया आज केली

भ्रान्त या जीवाची भ्रान्त फेडियली
आंधळ्यास नाथा दृष्टी नवी आली

संसार असार द्न्यान आज झाले
वासना मृगाचे खरे रूप कळले

विरक्तीत अनुरक्ती नामात चित्त
वित्तएषणेचा झालासे अंत

लीन तुझे पायी दीन मी  नाथा
देई देई हाता तूच   झडकरी

नको धन संपत्ती नको रिद्धी सिद्धी
लागो प्रीती पायी अहो गुरुदेवा

निर्जनी जाऊ तिथे तुला पाहू
तुझ्या विना नाही अन्य कुणी त्रात

सत्य असत्याचे द्न्यान प्रभो द्यावे
तुझ्या दर्शनाने  भाग्य  उज ळावे

Wednesday, 24 August 2016

बोलके डोळे बोलतात----

बोलके डोळे     बोलतात
बोलता बोलता    हृदयात
खोल खोल खोल घुसतात
सागर घुसळून काढतात
विकार लाटा  उठतात
विचार फेसाळ फिरतात
नजरेच्या परीस स्पर्शाने
पोलादी मनाची पांखरे
सोनेरी रूपे  घेतात
दाही दिशांत उडतात

Tuesday, 23 August 2016

साधकाचे आश्रयस्थान--

साधका,
जीवन यात्रा सुरु झाली जन्मापासून
मृत्यू विश्राम एक.
तिथून पुन्हा महायात्रा.
नवा जन्म ,नवा प्रवास,दीर्घ यात्रा.
नामरूपी शिदोरी सोबत घे
ठेवील ती सुखात.
काम क्रोधादि हिंस्र पशूंना
जवळ ती येऊ देणार नाही.
नामात दंग हो,धुंद हो.
होऊदे मनाची,बुद्धीची
भगवतीशी एकरूपता
घेता घेता नाम
जाईल मनातून काम
काम जाताच
शुद्ध होईल मन
तेच खरं नमन.खरं समर्पण.
अहंचं विस्मरण.
बिन बोभाट,बिन तक्रार, बेलाशक
यात्रा तुझी होईल सफल.
हेच साधकाचं ईप्सित
आश्रयस्थान.

Monday, 22 August 2016

असा तू मायाळू,अनंत कृपाळू---

देवा, केली न सेवा
तरी  देशी  मेवा
असा  तू  दयाळू
अनंत   कृपाळू

केला  न  जप
ना  केले  तप
तरी  दिले  खूप
हवे  जे  ते

केला न  नेम
पाळला न धर्म
तुझे वर्म  मर्म
कुणाही कळेना

कळेना कुणा कुणा
देशी  काय  काय
त्यांच्या  जीवनी
नुरे  हाय हाय

दया तुझे प्रेम
न मागता मिळाले
असा तू मायाळू
अनंत  कृपाळू

Sunday, 21 August 2016

प्रत्येकाच्या प्रपंचात

प्रपंचात सुख नसते
सुखासाठी धडपड नुसती
तडफड जिवाची
प्रयत्नांची शर्थ
प्रपंच खोटा असतो.

संपत्ती असते.
संतती नसते.
संतती असूनही
सुख नसते.

प्रत्येकाच्या प्रपंचात
काही ना काही उणीव असते.
ही सारी किमया
त्याची असते.

प्रपंच त्याचा.
निमित्त तू
असा ठेव भाव
असू दे दृढ विश्वास.

मग बघ
प्रपंचाचा नूर बदलतो
.प्रपंचातलं दुःख जाणवत नाही.
प्रपंच सुखाचा होतो.
सारंसारं सुसह्य होतं.
सुकर होतं.

उणीव कुठंच राहात नाही
.हवी फक्त त्याची कृपा.
मग नसते कुठलीच भीती.

Saturday, 20 August 2016

तरीही निरभिमानी,निरहंकारी,निश्चल तू----

तू चिंतामणी
चिंता आता न राहिली
निश्चिंत झालो मी
चिंता देऊन तुला.

तू तर कल्पतरु
वांच्छिले ते दिले
काही काही न ठेवले
कोड सर्व पुरवले

तू आहेस परीस खरा
जीवन रूपी लोहाचे
केलेस  सोने
तरीही-----

निरभिमानी,निरहंकारी,
निश्चल तू
तुला न कसली
आसक्ती.

म्हणून
शिकवी भक्ती
देई शक्ती
भक्तास या.


Friday, 19 August 2016

राम नाम--

घेई घेई वाचे घेई
राम नाम घेई
राम नाम आहे
पूर्ण सुखदायी

राम नाम घेणे
हाच नित्य नेम
राम नाम घेणे
हेच सदा काम

राम नामे चित्त
होईल रे शुद्ध
राम नामे बुद्धी
 होईल प्रबुद्ध

राम नामे होई
आनंदाची प्राप्ती
राम नामे होई
ईश्वराची प्राप्ती

पिता ,माता राम
गुरू भ्राता राम
सुखदाता राम
संसारी  या.

Thursday, 18 August 2016

तो जेव्हां संतुष्ट होतो---

प्रसाद म्हणजे मनःशुद्धी,चित्तशुद्धी,
भावशुद्धी',आत्मबोध.
प्रसाद म्हणजे जागृती.
प्रसादाने येते प्रसन्नता
प्रसादासाठी करावे लागतात प्रयत्न,
प्रसन्न करावे लागते भगवंताला.
तो जेव्हां संतुष्ट होतो
पाहून आपले प्रयत्न.
जीवापाचे प्रेम प्रचितीला येते तेव्हां
तेव्हांच तो प्रसन्न होतो,प्रसाद देतो.
तीच त्याची कृपा.तेच त्याचे छत्र.
त्या कृपाछत्राखाली
निश्चिंत असतो साधक.
योग क्षेम त्याचा तोच चालवतो.
प्रसाद आळशाला मिळत नसतो
त्यासाठी सातत्याने करावे लागते
स्मरण त्याचे.
त्याचे शुभदर्शन होताच
अशुभाचा,अशुचीचा नाश होतो.
सर्वत्र शुभाचीच उपलब्धी !अस्तित्व.
कुठंच नसतं
अशुभ,अशोभनीय वा अशुचित्व..

Wednesday, 17 August 2016

त्याचे सर्व व्यर्थ-

सुंदर कलत्र
धन संपदाही खूप
ज्याचे जवळ.
पुत्र पौत्र ज्याला
हवे तेवढेच.
बंधु बांधवांचे
 असे ज्यास सुख.
राहाण्यास ज्याला
वास्तूही सुरेख.
खायची प्यायची
ददात न काही.
वस्र प्रावर्णांची
असे रेलचेल.
तरीही जो विन्मुख
सद्गुरू चरणाहून
त्याचे सर्व व्यर्थ.
क्षणोक्षणी त्याचा
होई अधःपात
नरकवास जीवन
होई त्याचे

Tuesday, 16 August 2016

आनंदी आनंद

येऊ दे आता प्रेमाचा पूर
न्हाऊ दे सारे चराचर
तुझीच लेकरे,स्वच्छंद पांखरे
गाती गाणी सारे,आनंदाची
आत ही आनंद,बाहेर आनंद
आनंदी आनंद सर्वदूर
आनंदाचा कंद,एक भगवंत
झाला कृपावंत सर्वांवर
देहाचे भान नुरले कुणाला
ओंकार नादी रंगले मन
प्रणवघोषे निनादती दिशा
हासते उषा उल्हसित
प्राचीचा दीप उजळला आज
लेवूनी साज कैवल्याचा

Monday, 15 August 2016

देवी स्तवन---

सुंदरी त्रिपुरारी तू
आत्मस्थ तू,हृदयस्थ तू
कूटस्थ तू,चंद्रानने,
सृष्टीतले चैतन्य तू
दृष्टीतला आनंद तू,
तू चिन्मयी,मधुभाषिणी,
जगतारिणी जगदंबिके,
हे शिवे, कल्याणी तू
अमृते , परमेश्वरी,
वत्सले,स्नेहांकिते,
वत्सास या,तू स्नेह दे,
दे शक्ती देवी कालिके,
हे सुगंधे,दिव्य गंधे
संस्कृतीची तू प्रेरणा,
अनादि तू,वरदान दे
दासास या.
न्याय नीती,धर्म प्रीती,
कर्मभक्ती,
विश्वात देवी ,वाढू दे.

Saturday, 13 August 2016

जीवनाचं अंतिम लक्ष्य--

मना मना जागा हो
बघ जरा जाणून घे
सत् असत्
ब्रह्म सत्य हेच खरं
जगत भास माया पाश
छळतात वासना
मुक्ती त्यातून हवी ना?
एकच युक्ती
नामात भक्ती
अढळ श्रद्धा
पूर्ण निष्ठा
आपोआप वाढेल मग
ईश्वरानुरक्ती!
नामात अगाध शक्ती
जाऊन आसक्ती
येईल विरक्ती
जाणशील शुद्ध रूप
स्वतःचं.
तीच आत्मोपलब्धी
ब्रह्म प्राप्ती
तेच गन्तव्य
तीच भगवत प्राप्ती
जीवनाचं अंतिम लक्ष्य,
अंतिम उपलब्द्धी.

Wednesday, 10 August 2016

निमुटपणे काडी होऊन पडून राहाण्यात-----

कोपऱ्यातली काडी पाहातेय इकडे
निपचित पडून डोळे मिटून अर्धवट
म्हणते ती----
असंच असंच एक दिवस तुलाही
लागेल पडावं कुठल्याशा कोपऱ्यात.
निष्प्राण,निश्चेतन,अगतिक,स्तब्ध
सारं सारं सामर्थ्य,ऐश्वर्य सोडून
एकाकी लागेल पडावं कदाचित्
लागेल सडावं.
समजून घे ,उमजून घे---
इथं जगात आपलं काहीही नसतं.
सारं सारं ईश्वरी सत्तेनं,त्याच्याच
तंत्रानं घडत असतं.
निमूटपणे काडी होऊन मिळेल त्या
कोपऱ्यात पडून राहाण्यात
शांन्ती असते.सुख असते.
समाधान असते.

Tuesday, 9 August 2016

हाकेला तू ओ देतो हा-----

वय झाले पण सोय नआली
विषय सुखातच मन रमले
सगे सोयरे आप्त स्वजन
कुणी न कुणाचे
सत्य आज कळले.
धन संपत्ती सत्ता सारे
मुळी न सोबत करते
भेटी साठी मासोळीसम
तडफड तडफड होते.
प्रेमळ तू मज द्यावा देवा
निखळ प्रेम प्रसाद
विश्वासाने साद घालतो
देई देई प्रतिसाद.
मार्ग दाखवी कल्याणाचा
आर्त हाक देवा
हाकेला तू ओ देतो हा
संतांचा दावा

Monday, 8 August 2016

पाहाणारे डोळे---मिटलेले डोळे

पाहाणाऱ्या डोळ्यांना दिसते का काही?
नाही नाही नाही काहीही नाही
देतात ते ग्वाही.
मिटलेल्या डोळ्यांना दिसते का काही?
काहीही काहीही लपलेलं नाही
देतात ते ग्वाही.
पाहाणारे डोळे वरवरचे बघतात
रंगरूप रूपरंग पाहून फसतात.
मिटलेले  डोळे  आतले  बघतात.
छद्मवेषातील वृत्ती प्रवृत्ती जाणून घेतात.
रंगरूप रूपरंगाचा सामान्य बोध
पाहाणाऱ्या डोळ्यांची इवलीशी प्राप्ती.
सहजात वृत्तींचा अंत प्रवृत्तींचा
यथार्थ बोध.
मिटलेल्या डोळ्यांचे अक्षय भांडार.

Sunday, 7 August 2016

या दृष्टीचे वेड लागता---

तव डोळ्यांचे संमोहन
              तू  मोहन
 देहभान मी विसरुन जातो
  जातो विसरुन कोण काय मी
  स्थिर नजरेने पाहात बसतो
              तव डोळ्यांचे
               अद्भुत दर्शन
     या दृष्टीला राधा भुलली
      भुलली  कुब्जा या दृष्टीला
       तुला पाहाता कळे न केव्हां
                       गळून पडते
                        माझे मी पण
           या दृष्टीचे वेड लागता
            सृष्टीचे अस्तित्व संपते
             जीवनात संजीवन येते
                              ऐकू येते
                             मधु मधु गुंजन.
     

राम नामें -----

राम नामें
होई शुद्ध मन
शुद्ध होई तन
चित्त लागे पायीं  
      भगवंताच्या
तोच तारणारा
तोच मारणारा
राखणारा तोच
       तुम्हां आम्हां
त्याची सर्व लेकरे
खोटा अहंकार
मी माझे हा व्यर्थ
         भ्रम जीवां
त्याचे तोच जाणे
मना लीन हो तू
भजन करी रे
         रात्रं दिन.

Saturday, 6 August 2016

त्याला इतरांची ओळख कुठून असणार ?

माझी मलाच लाज वाटते.
रोजरोज इतरांना समजायचा
माझा प्रयत्न वांझोटा.
यंव दिमाख
.मलाच  काय ते कळते.
कोण कसं
खोटा टेंभा.
माणूस स्वतःच स्वतःशी
प्रामाणिक नसतो.
वास्तविक चोवीस तास
स्वरूपाच्या सान्निध्यात
असतो तो.
स्वतःच स्वतःपासून
दूरदूर पळत असतो
जाणलं मी ते याला त्याला
खरं यात काहीच नसतं.
रिकामी उठाठेव
ज्याला स्वतःच्या रूपाकडे
पाहायला वेळ नसतो
स्वतः स्वतःला
ओशखत नसतो
त्याला इतरांची खरी ओळख
कुठून असणार?

तू ईश्वर ,भगवन् मी मात्र नश्वर---

  तू हंसतोस तेव्हां
   लाखलाख चांदण्या हंसतात
    असं हंसणं दिलखुलास
     सर्वांना सुखवणारं
      सर्वांना फुलवणारं
     तुझं हंसणं कळतं ज्याला
      तोही हंसतो.
     असं हंसणं मिठास तुझं
      तुझं हंसणं सुगंधी
       क्षणोक्षणी हंसून
        हंसवतोस सर्वांना
        हीच तुझी नवलाई
      हेच तुझं ऐश्वर्य
       म्हणून तू ईश्वर.
       भगवन्
       मी मात्र नश्वर.
       मर्त्य मानव, अल्पजीवी.
       तू शरीरीं असून अशरीरी
        मी मात्र शरीरातील शिरशिरी.

Thursday, 4 August 2016

तिचं वेड लागताच----

  साधनेत मन रमत नसतं
  क्षणोक्षणी  नवी नवी रूपे
   धारण करते  ते
  .कामरूप मायावी.
   फसवतं कळत न कळत.
    फसल्यावर कळतं.
     खूप  उशीरा.
    शक्तीशाली मनाला
    युक्तीनं भक्तीत जुंपावं.
    नामात गुंतवावं.
     तेव्हां ते तदाकार
      तल्लीन होऊन
       ताळ्यावर येतं
       दडी मारून बसतं.
        चिडीचुप गुपचुप
.      तरंग कुठलाच नसतो.
        वासना ,विकार,
         विखार विषारी.
       शांत सारे.
      आत्म्यातच लीन ते.
      दीन होऊन शरणागत.
    ..सामर्थ्यशाली सत्तेच्या
       इशाऱ्याने करते वाटचाल.
       शेवट पर्यंत पोहचवणारी वाट
       त्याला सापडते.
        निजगृही निजानंदात
        मस्त होऊन जाते ते.
        हुरहुर नसते, काहूर नसते.
        असते ती स्तब्धता,शांतता.
       . आनंददायी,आनंद वर्धक,
          संक्रामक.
        तिचं वेड लागताच
        द्वैत संपतं.
        अद्वैताचा होतो साक्षातकार.
        येतो प्रत्यय.
       चराचरांत विश्वंभर दिसतो.
       सत्ता त्याचीच.
      द्वेष,असुया अहंकार सारे सारे
      संपते.क्षुद्रातिक्षुद्र जीवातही
     आत्म्याचे दर्शव होते.

Wednesday, 3 August 2016

कणाकणातून क्षणाक्षणाला---

तू   नाही  कुठे  ?
तू इथे तिथे सर्वत्र
आतही तू बाहेरी तू
तूच परम पवित्र
       ही सृष्टी तुझीच लीला
       चंद्र, सूर्य अन् नक्षत्रेही
        तूच दिली आम्हाला
         तू पालक या जगताचा
  तू स्वामी या जगताचा
   संहारक ही तूच तूच तू
   ब्रह्मा ही तू,विष्णुही तू
    शिवही तुझेच  रूप
            पर्वतराजी सुदूर दिसते
             दाखविते ती तुझी भव्यता
             चराचरातून स्नेह पाझरे
              हीच तुझी दिव्यता
    अधांतरी    नभ
     निळा   चांदवा
      निळ्या नभातिल  सौंदर्याचा
       तूच  नसे  का  निर्माता  ?
                 हे वाहती वारे मंदगती
                  या सरिता धावती कुणाप्रती ?
                   रत्नेशाचा  ईश तूच रे
                    तरीही असशी सूक्ष्मगती
        फुलेही फुलती
         रंग  उधळती
          जगां खुलवती
           सुगंध देती दिशादिशाप्रती
                     कणा कणातून क्षणाक्षणाला
                      तव   सत्तेची
                       तव   स्नेहा ची
                        ये    प्रचिती.
     

Tuesday, 2 August 2016

करिशी का तू खंत?

करिशी का तू खंत?
वेड्या, हृदयी तुझ्या भगवंत
कृपा तयाची अद्भुत होता
हो  दुःखांचा  अंत
भक्ती त्याची सुफलित होता
    निर्धन  हो  धनवंत ,वेड्या ,
आंधळ्यास तो देतो दृष्टी
पांगळ्यास तो देतो शक्ती
एक पाहातो सारी सृष्टी
     दुसरा फिरे दिगंत,वेड्या,
बहिऱ्यास येती कान
वेड्याला  होई  द्न्यान
बहुश्रुत होऊन फिरे एक
     तर दुसरा बने महंत,वेड्या,
मुक्यास देतो वाचा शक्ती
करू लागता ईश्वर भक्ती
अलभ्य लाभे जीवनमुक्ती
      मिळतो  ब्रह्मानंद,वेड्या,
       हृदयी  तुझ्या भगवंत.  

Monday, 1 August 2016

समर्पण---

समर्पण
काया,वाचे,मने व्हावे.
काया तुझीच किमया.
माते ,तुझ्याच कामी
कणकण क्षणक्षण झिजावी.
निशीदिन तुझेच स्मरण.
तेच जीवन .तेच चैतन्य.
तुझे विस्मरण म्हणजेच
मृत्यू.
तुझी इच्छा बलवती ,अंतिम.
तुझ्या इच्छेप्रमाणेच
सर्व इंद्रियांच्या हालचाली
व्हाव्यात.
त्यांचा भाग  त्यांना मिळावा,
तृप्ती व्हावी.
श्वासोच्छवास तुझ्या कार्यासाठी
वाणी तुझ्या संकीर्तनासाठी.
बोलणारी शक्ती तूच.
तुझे रूप,तुझे गुण,
वैभव तुझे,तुझे यश,
कीर्ती तुझी,तुझा पराक्रम
शब्दाशब्दांतून व्यक्त व्हावा.
सर्वत्र पसरावा भक्तीचा सुगंध.
मनाला तुझे व्यसन जडावे.
तुझे चिंतन तुझे मनन
तुझ्याच अस्तित्वाचा
आविष्कार व्हावा सदा सर्वकाळ
प्रत्येक कृतीतून उक्तीतून
हाच ध्यास,हेच ध्यान,
हाच अभ्यास घडावा जन्मोजन्मी .
तुझी भेट होई पर्यंत.