Wednesday, 4 October 2017

भावतरंग--- आत्मचिंतन ते आत्म दर्शन

'स्व 'चा शोध म्हणजेच आत्मशोध.आत्मशोधाची सुरुवात आत्म चिंत-नाने होते.चिंतनातून आत्म निरीक्षण होऊ लागते.निरीक्षणातून आत्म-
परीक्षणाचा जन्म होतो.आत्मपरीक्षणातून स्वभाव दोष दिसू लागतात.
स्वभाव दोष जसजसे दूर केले जातात तसतसे चित्तशुद्ध होऊ लागते.
चित्त शुद्धी झाली की आत्म दर्शन होते.
       स्वतःचं निरीक्षण अलिप्त होऊन करता यायला हवं.लिप्ततेमुळे नको
त्या ऊर्मींना प्राधान्य दिलं जातं.त्या ऊर्मीतून जे विचार जन्माला येतात त्या-
तून होणारी कृती तारक होऊ शकत नाही. कृतीचं विकृतीत न कळत रूपां-
तर होऊ लागतं व माणसाचं हंसं होतं.पण तो मात्र समजतो की मी करतो
तेच योग्य आहे.त्यामुळे वरवरचं समाधान मिळतं.त टिकाऊ नसतं.त्याचा
अहं मात्र सुखावतो.मी जगा वेगळाअसून माझं व्यक्तिमत्व भारदस्त अस-ल्याचं त्याचं मत पक्कं होत जातं.त्यातून इतरांना आपल्यापेक्षा कमी लेख-
ण्याची वृत्ती जागृत होते.इतरांना कमी लेखण्याने ते दुखावतात व त्याच्या
पासून दुरावतात.
       वास्तविक प्रत्येकजणच जगा वेगळाअसतो.प्रत्येकाचं अस्तित्व आगळं वेगळं असतं.आकार,रंग, रूप यात थोडं फार साम्य असलं तरी
अंतरंगातले रंग प्रत्येकाचे वेगवेगळे असतात त्यामुळे माझंच व्यक्तिमत्व
भारदस्त हा निव्वळ भ्रम असतो,भास असतो हे समजायला जितका 
उशीर होतो तितका माणूस अप्रिय होत जातो.जसजसे हे सत्य त्याला
उमगते तसतसी त्याची वागणूक बदलते त्याच्या वृत्ती विचार व कृती- 
मधील विखार दूर होतो.

Thursday, 4 May 2017

अशा स्थितीला काय म्हणावे ?

अंधारल्या दिशा दाही
काहीही दिसेना
मनातल्या भाव भावना
थांबता थांबेना

विचार आवर्त
आवरता आवरेना

आत बाहेर
स्थिती एकच
बाहेर अंधार
आत कोलाहल

एकाचं एकास
काहीही कळेना

अशा स्थितीला
काय म्हणावे
काहीही कुणाला
आकळेना कळेना

Wednesday, 12 April 2017

भावतरंग-यशापयशाला आपणच जबाबदार असतो

... भावतरंग-यशापयशाला आपणच जबाबदार असतो " स्व "चा शोध. स्वतःच्या स्वप्नांचा शोध.इच्छा,अपेक्षा,आकांक्षा माणसाला कार्य प्रवृत्त करतात.त्यांच्या पूर्तीसाठी त्याची अखंड धडपड असते. त्याला नेमकं काय हवं आहे हे त्याचं त्यालाच माहीत असतं. त्याच्या प्राप्ती- साठी चोखाळायचे मार्गही त्यानेच निश्चित केलेले असतात. त्याच्या सारख्या इच्छा,अपेक्षा, आकांक्षा बाळगणाऱ्या व त्यांच्या पूर्ती साठी धडपडणाऱ्या ,समानशील असलेल्या व त्यात यशस्वी झालेल्या लोकांनी अनुसरलेल्या मार्गावरून त्याला जायचं असतं.त्यांच्या जीवनप्रणालीचं,धेय्यपूर्ती -साठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांचं तो अनुकरण करतो. एकदम नवीन वाट तो आक्रमित नाही.या प्रयत्नात त्याला यश मिळतंच असं नाही.यश मिळालं तर माझ्या परिश्रमामुळे असा त्याचा ग्रह असतो.अपयश अालं तर कुणाच्या तरी अडथळ्यामुळे असं त्याचं म्हणणं असतं यशाचं श्रेय स्वतः घ्यायचं,अपयशाचं खापर मात्र दुसऱ्याच्या वा दैवाच्या डोक्यावर फोडायचं अशीच सर्वांची तऱ्हा असते.यशापयशाला आपणंच ज- बाबदार असतो याची जाणीव नसतेच त्याला. हेच त्याचं अद्न्यान.अद्न्यानामुळे नुकसानच होतं.-/

भावतरंग-पतनाचं कारण अहंकार

. .भावतरंग-पतनाचं कारण अहंकार स्वप्नपूर्तीचा आनंद वेगळा असतो.केवळ स्वप्न पाहून स्वप्नपूर्ती होत नाही. स्वप्नपूर्तीसाठी खडतर प्रयत्न करावे लागतात.स्वप्नपूर्तीचा संकल्प दृढ असा- यला हवा.संकल्पाच्या पूर्तीसाठी निश्चित दिशेने पावले उचलावी लागतात. पूर्ती नंतर थकवा पार दूर होतो.आनंदोर्मी उसळतात.या आनंदाला सीमा नसते.अर्थात हा आनंद क्षणिक असतो.पण तो सहसा विस्मृतीत जात नाही. पुन्हा नवे स्वप्न माणूस पाहू लागतो व त्याच्या पूर्तीसाठी धावत राहातो.स्वप्ना- मागून स्वप्नपाहायची माणसाला हाव असते. स्वप्नाचं लक्ष्य समृद्धी,उत्कर्ष,शक्ती संपादन,द्रव्यप्राप्ती इत्यादी असतात. स्वप्न पूर्ण होण्यासाठी अनेकांचे हातभार लागावे लागतात. जनसंपर्क दांडगा असावा लागतो.निरलस,निस्वार्थपणे जनसेवा करावी लागते.सर्व सामान्यांच्या हृदयात स्थान मिळवावं लागतं.त्यासाठी त्यांची सेवा निरंतर करावी लागते.एकदा जनतेच्या हृदयावर आरूढ झालात की आपोआप सत्तेची खुर्ची वश होते.ती मिळाली की अहंकार वाढतो वतोच पतनाला कारण होतो. अहंकार माणसाला क्रूर बनवतो.त्याची सत्ता सेवेसाठी राहात नाही. तो स्वार्थी बनतो.केवळ स्वार्थच त्याचं लक्ष्य असतं. त्यामुळे तो समृद्ध होतो.पण ते ऐश्वर्य शापित असतं.अनेक शोषितांचे तळतळाट त्यात समाविष्ट असतात. शेवटी अशी काही आपत्ती अचानक येते की त्यातून सुटका होत नाही.

Tuesday, 11 April 2017

भावतरंग-मनाची स्मृतीशक्तीच दुःखदायक असते:-)

:-) ... भावतरंग-मनाची स्मृति शक्तीच दुःखःदायक असते. एकटा बसलोय.मनात खूपखूप विचार येताहेत.सर्वच आठवणी.गत काळातील घटनांचे पडसाद.गेले दिवस निघून गेले.झाल्या गोष्टी घडून गेल्या. मनात मात्र अजूनही ठाण देऊन आहेत.जणु काल सगळं घडलं असं वाटतं . मनाची स्मृतिशक्तीच खरं म्हणजे दुःख दायक असते.विसरणं म्हणजे घटनेचा सारा तपशील पुसला जाणं पण तसं होत नाही . कुणी लावलेला बोल,कुणी केलेला अपमान,कुणी केलेली निंदा नालस्ती,सारं सारं मन साठवून ठेवतं. माणूस जेव्हां एकटा असतो तेव्हां कुठला तरी एक पापुद्रा उचकटला जातो.अचानक.त्याला नेमकं काही कारण असतंच असं नाही. एकदा का मनस्तरंग उठायला लागले की त्यांना अंत नसतो. माणसाचं पूर्वायुष्य उत्तरायुष्याच्या विश्रांतीच्या वेळी त्याला सारखं डिंवचत असतं. असं का? असंच कसं घडलं? असंच का घडलं?तेही फक्त माझ्याच बाबतीत? हीच का नियती?,प्रारब्ध?प्राक्तन? पूर्वायुष्याचं फलित? आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या चुका केव्हां न केव्हां माणसाला छळत असतात.

Monday, 10 April 2017

भावतरंग--जेव्हां आपण एकटे असतो

... भावतरंग---जेव्हां आपण एकटे असतो. मनाचा शोध घेता घेता जाणवते की बहुदा आपणच दोषी असतो पण मुखवटा धारण करून आपण तो दोष झाकून ठेवतो.त्यामुळे जीवनातील ती काळी बाजू समोर येत नाही. जेव्हां आपण एकटे असतो तेव्हां मात्र आपल्याकडून घडलेल्या चुका आपल्या समोर येतात व माणूस स्वतःलाच कोसू लागतो.सारखं असं पुन्हा पुन्हा घडू लागल्यास माणसाचं व्यक्तिमत्व दुभंगतं.आपले दोष लपवण्यासाठी करावी लागणारी कसरत त्याला मनः शांती लाभू देत नाही.उद्विग्नता वाढत जाते.व त्याच्यात भयगंड व हीनगंड निर्माण होतात. जो उजळ माथ्याने मोठ्या तोऱ्यात वावरायचा तो एकाकी राहू लागतो या एकलकोंडेपणातून कधी कधी वेड लागण्याची शक्यता असते. माणूस भलेही हजारदा इतरांच्या डोळ्यात धूळ फेकण्यात यशस्वी होवो परंतु जेव्हां वय होतं,परिपक्वता वाढते,शेवटचा दिवस डोळ्यासमोर येतो इंद्रि-यांची शक्ती कमी झालेली असते,तेव्हां भूूतकाळातील चुकीचं वर्तन त्याला छळू लागतं.मोठी विचित्र अवस्था असते. शरीरात तसा कोणताच दोष आढळून येत नाही पण मन मात्र बेचैन असतं ते स्वतःलाच कोसू लागतं.त्यावरचं नियंत्रण आपसुक सुटतं व माणूस बेभान होतो. इतरांना कळत नाही की याला काय होतंय.वेगवेगळे तर्क वेगवेगळे निष्कर्ष काढले जातात.तऱ्हे तऱ्हेचे उपाय सुचवले जातात.

भावतरंग ---अस्तित्वाचा प्राण- चैतन्य

... भावतरंग--अस्तित्वाचा प्राण--चैतन्य खरं म्हणजे स्वतःच्या अंतरंगाचा अंतही लागत नाही व रंगही कळत नाही. अंतरंगात इतके विविध तरंग उठतात. त्यांची गणना करणे अशक्यच नव्हे तर. दुस्तरअसतं.तरीही ज्यांनी ज्यांनी अंतरात्म्याचा शोध घेण्यासाठी आपलं जीवन कामी लावलं त्यांनी जी वाट चोखाळली ती प्रत्येकाची स्वतंत्र आहे .म्हणूनच ध्यानाच्या विविध पद्धती अस्तित्वात असाव्यात.कुणाला केव्हां कशी उपरती होईल हे सांगता येत नाही.उतरती झाल्यावर तो जी वाट चोखाळतो ती त्याची स्वतःची असते. मार्गदर्शक फक्त वाटेचा निर्देश करू शकतो. चालावं तर स्वतःलाच लागतं दिशा दिग्दर्शन एवढंच मार्गदर्शकाचं काम असतं.बोट धरून तो ईप्सिता पर्यंत नेऊ शकत नाही.त्याला त्याचं ईप्सित प्राप्त झालेलं असतं.आपलंही तेच ईप्सित असेल असं नाही. चैतन्याचा स्रोत अविरत वाहात असतो.जन्मापूर्वीही त्याचं अस्तित्व असतं,मृत्यूनंतरही ते अस्तित्व अबाधित असतं असं ज्यांनी जाणलं त्यांचं म्हणणं आहे.त्यालाच ते आत्म शक्ती ,परमात्म शक्ती म्हणतात.आत्म्याचा शोध म्हणजे अस्तित्वाचा शोध,अस्तित्वाचा आधार -नव्हे प्राण! तेच चैतन्य.ते चराचरात भरलेलं आहे. जड वस्तूत ते सुप्तावस्थेत असतं एवढंच अन्यथा अणुतून भयानक विस्फोट झाले नसते.ते होतात म्हणजे ते अणूत सुप्तावस्थेत असतात. मनाची शक्ती अगाध आहे.संकल्पातून निश्चयात्मक वृत्ती जागृत होतात. त्यांच्याशी प्रामाणिक राहून वाटचाल केल्यास गन्तव्याप्रत पोहोचता येते.

Tuesday, 14 March 2017

मातीची विलक्षण किमया

पहाटे पहाटे फुले उमलली आहेत.चांदणी,चमेली,जाई,जुई,बोगनवेली,चाफा, सोनचाफा.विविधरंगांची व आकाराची फुले .जाई,जुईची नाजुक इवली इवली फुले.सोनचाफ्याची सोनरी रंगाची.बोगनवेलींचे अनेक रंग ,पारीजातकाचा झाडा खालीच पडलेला खच,जास्वंदीची लाल भडक फुले पांढरी.पिवळी,शेंदरी,लाल, निळी.अनेक रंगांच्या विविध छटा पाहून डोळे निवतात.मन हरखतं खरं म्हणजे फुलं झाडांवरच छान दिसतात.माणूस मात्र हे समजून घेत नाही. देवाला वाहण्यासाठी तो त्यांना हारात गुंफतो.प्रियतमेच्या डोक्यात माळण्या- साठी गजरे करतो.गुच्छ करतो.वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे हार,गुच्छ दिले जातात.फुलांचा मंद सुगंध माणसाला धुंद करतो. मातीची किमया विलक्षण असते.एकाच जागी उभ्या असलेल्या विविध झाडांना वेगवेगळी पोषक द्रव्ये ती पुरवते.एकाच मातीत उगवणारं निंबाचं झाड कडू फळं धारण करतं.तिथंच असलेला आंबा गोड व रसाळ फळे देतो. आवळ्याला तुरट फळे .गुलाबाला कांटेही व धुंद करणारी सुवासिक फुले . एकच माती विविध झाडांनाब त्यांच्या त्यांच्या गरजे प्रमाणे विविध रस पुरवते. त्यांचं पोषण करते. माती जवळ आपपर भाव नसतो. आपला तुपला विचार नसतो.आमच्या जगात मात्र तसं का नसतं?

Monday, 13 March 2017

...इथले सारे इथेच राहाते

मी मी म्हणत म्हणत
सारं आयुष्य जातं
कोण मी? कुणाचा मी?
काही न कळता
सारं सारं संपतं
  पै पै जोडून
महाल उभा होतो.
जोडा जोड
करता करता
उपभोग राहून जातो.
कुणाला न सांगता
जीव एकटाच निघून जातो.
इथले सारे सारे
इथेच राहाते.
मित्र,परिवार,
सगे सोयरे
स्मशाना पर्यंत
सोबत करतात.
अश्रू दोन ढाळून
मेलेल्याला
विसरून जातात.

शब्दांचा खेळ सारा---