Wednesday, 29 June 2016

आज ढळत्या वयात-

सावधान शब्द ऐकताच
रामदासांनी बोहल्यावरुन पळ काढला.
उपासना, साधना ,कठोर तपस्या करुन
स्वामी झाले.समर्थ झाले.
मी मात्र अधीर होतो सावधान शब्द ऐकण्या साठी
तो शब्द कानावर पडताच कोण आनंद झाला!
गळ्यात माळ पडावी म्हणून कोण घाई!
क्षणिक आनंद होता तो.

तेव्हां पासून गमावलं काय ,मिळवलं काय
याचा हिशोब केला.
आज ढळत्या वयात ताळा केल्यावर कळलं
हाती काहीच आलं नाही.
प्रपंच लटका.
दुःखाचे डोंगरच वाट्याला आले.
सुख क्षणिक.
अश्रूंची गणतीच नव्हती
जखमा तर रोज रोज होत राहिल्या.
तरीही सावध झालो नाही.
जाग आली नाही.
कळलं आकळलं नाही.
वेदनांच्या डोहात पुन्हा पुन्हा लोटला गेलो.
तरी पोहायची हौस  फिटली नाही.
भवसागर तरायची आस अजून तशीच आहे.
रडता रडता जगणं. क्षणोक्षणी मरणं
असंच चाललंय.असंच चालत राहील
उदास मनाला मनाचे श्लोक ऐकवायचे
उपासना साधना शून्य.

रामदास सूद्न्य होते.मी मात्र अद्न्य,अडाणी,
वेडा जीव.
वेडावणारं जीवन जगायची हौस होती.
ती अपूर्णच.
वेड घेऊन नेहमीच पेडगावला मात्र जावं
लागलं.
नियती,प्रारब्ध, कर्मगती हीच दुसरं काय?

जगीं भरला भगवंत

जगीं भरला भगवंत.
जलातही तो,स्थलातही तो,नभातही तो.
तोच अंतरीक्षात.
सूर्य तो अन् तोच चंद्रमा,ग्रहतारे नक्षत्रेही
तोच .
पर्वतात तो,खाईतही तो,तोच नदी नाल्यात.
पशूत तो,पक्ष्यातही तो,तोच जीव जंतूत
फुलातही तो,मुलांतही तो,वृक्षातही तो,
वेलींतही तोच.
सिंहातही तो,व्याघ्रातही तो,तोच वनात जनात

तुझ्यातही तो, माझ्यातही तो,तोच नटे सर्वात.
तोच चालवी, तोच बोलवी,तोच वसे मौनात.
भोगातही तो,त्यागातही तो,धर्मातही तो.
अधर्मातही तोच.
राजाही तो,रंकही तो,साधूही तो, भोंदूही तो,
तोच गुरु शिष्यात.
तोच जगाचा निर्माता,भोक्ताही तोच.
पालन कर्ता ,संहारकही तोच.
गंमत जम्मत,जय पराजय,सुख दुःखाचा,
लाभ हानी वा प्रिय श्रेयाचा,द्वंद्वात्मक या
भासाचा,असे नियामक तोच.

सर्वभावे शरण जावे',यंत्र होऊन सदा भजावे.
यंत्री तो त्याची सत्ता इथे तिथे सर्वत्र.
पिंडातही तो,ब्रह्मांडातही तो.
उरे पुरुन सर्वात.

जीवन त्याचे देणे.
त्याला क्षणक्षण स्मृतित ठेवती साधू अन् संत.

ह्या सत्त्याची येता प्रचिती
अहंभाव तो विरून जातो
कर्तृत्वाची शेखी नुरते.
उरतो आत्मानंद केवळ ब्रह्मानंद.

Tuesday, 28 June 2016

खेळ त्याचा

सत्ता, संपत्ती,सौंदर्य
ईश्वराची कृपा सारी
द्यायचं तेव्हां देतो
न्यायचं तेव्हां नेतो
माणूस मात्र म्हणतो
सत्ता मी मिळवली
संपत्ती कमाई माझी
सौंदर्याचा मी निर्माता
निखालस खोटं सारं
खेळ त्याचा त्यालाच
कळत असतो.
पटावरल्या सोंगट्या साऱ्या
चालतात त्याच्या निर्दे शाने
चाल त्याची कुणालाच  कळत
नसते.
दान पडले आपल्या हातून
वाटतेआपल्याला.
सोंगट्या आपणच चालवतो
म्हणतो आपण.
खरं तर
सारा सारा त्याचाच पसारा
त्याचंच कर्तृत्व
त्याचीच लीला.

Monday, 27 June 2016

हा क्षण उत्कटतेने जगूया

हा क्षण उत्कटतेने जगूया
सावधतेने जगूया
जागृत राहून जगूया
क्षण क्षण क्षण क्षण हो परिवर्तन
अणू अणूचे चाले नर्तन
देहा मधले हे संवेदन
   अलिप्ततेने बघूया
आनंदाची ऊर्मी येता
रोम रोम हो पुलकित
प्रेमप्रवाहे क्षणोक्षणी
    रसमय तनमन करूया
अगणित कानी येती मृदु स्वर
माधुर्याचे होई सिंचन
झरझर झरती अमृतधारा
सवे तयांच्या ताल धरूनी
     मधु मधु गुंजन करूया
शब्द , रूप ,रस,गंध, स्पर्शही
सारे सारे क्षणभंगुर हे
अनुभव  साचा हा सर्वांचा
प्रत्यय येतो या सत्याचा
      दर्शन त्याचे करूया
क्षणोक्षणी ये नवनव अनुभव
भवचक्राचे फिरणे अविरत
आहे त्याला अनुग्रह जाणुन
     उदासीन राहूया
साक्षीभाव हा येता येता
पदोपदी दृढ होते समता
प्रद्न्या जागृत होते मग ती
     दैन्य दुःखही जाते विलया

Sunday, 26 June 2016

माणूस-एक कोडं ?

माणूस?
एक न उलगडलेलं कोडं.
बोलतो तसं वागत नाही.
वागतो तसं बोलत नाही.
आत एक बाहेर दुसरंच.
दुटप्पी वागणं,
उठणं, बसणं,बोलणं.

उक्ती कृतीत मेळ नसतो
कृती कशीही झाली तरी
तिचंच समर्थन अहर्निश
हीच त्याची ओळख.

हजारों वर्षांपासून
माणसाच्या वर्तनाचे
निरीक्षण परीक्षण करताहेत
संशोधक मानसशास्रद्न्य
अजूनही माणूस कुणाला
उमगला नाही.
मन हाती आलं नाही
शोकांतिका.

बोल कुणाला लावायचा नाही
दोष कुणाला द्यायचा नाही.
असंच चालत आलंय
असंच चालत राहील
माणूस न सुटलेलं कोडं
हीच त्याची ओळख राहील.

याच गृहीतकावर
पुढची वाटचाल होत राहील.
वाट मुळी संपत नाही
शोध थांबत नाही
हाती काहीच येत नाही.

गंमत हीच गुंगवते मती
होते दुर्गती
तरी म्हणायचं होतेय प्रगती
आगेकूच!

Saturday, 25 June 2016

फूलोंने मुझको' हँसना सिखाया

फूलोंने हँसना सिखाया मुझे
काँटोंने सबको रुलाया.
कभी हँस कभी रो यही जिंदगी है
सितारेंने मुझको चमकना सिखाया

कभी सुख कभी दुख मिलेगा मुझे
धरतीने मुझको सहना सिखाया

कभी चॉंद बढता कभी चॉंद घटता
कभी यश मिलेगा, अपयश कभी तो
झरनेने मुझको चलना सिखाया

न डर किसीसे चलतेही रहना
लडना है हरदम विपदा बलासे
चीँटीने मुझको संग्रह सिखाया

हो राह फूलोंकी फिरभी न रमना
हो राह फतरीली फिरभी न थमना
लक्ष्य नदियाने अंतिम दिखाया

खिलती कलियॉं मुरझानेको
हँसकर एक दिन मर जानेको
मरनेसे पहले सुकीर्ति सौरभ
फैलाते रहना मुझको सिखाया .

Friday, 24 June 2016

म्हाताऱ्यांनी रडायचं नसतं

त्यांच्यासाठी खूप केलं .
पोटाला चिमटा देऊन  वाढवलं त्यांना.
म्हणायची सोय नाही.
व्यापार तोट्यात चालला
म्हणून नाउमेद व्हायचं नसतं

सोसायला हिंमत लागते
सोसता सोसताच मुक्यानं
शेवटचा श्वास शांत व्हावा
अशीच इच्छा ठेवायची असते.

रडायचं एकट्यानंच
हसायचं हसवायचं सर्वांना
रीत ही पाळली तर
तणावरहित होतं जगणं

सारंच एकदा झटकून टाकावं
स्वतःच समजून घ्यावं
त्यांच्या नादात त्यांना राहू द्यावं
आपलं आपण दुरून पाहावं

त्यांना मुळी वेळ नसतो
सगळाच खेळ असतो
डाव चुकला म्हणून
म्हाताऱ्यांनी रडायचं नसतं