Sunday, 12 June 2016

कोंबडंआरवताच

कोंबडं आरवताच उठणारी आजी,
झुंजू मुंजू होताच दळणारी सून,
तांबडं फुटताच भूपाळीचे सूर,
अलिकडे कानावर पडत नाहीत.

घरोघरी टीव्ही ,रेडियो टेप,वाजतात
भक्तीगीतं ऐकू येतात.तीच ती रटाळ गाणी

ते खेडं आनंदी,उत्साही,साधंभोळं,
जगा जगू द्या जाणणारं,प्रेमानं भरलेलं,
आल्या गेल्याची वास्तपुस्त करणारं
आतिथ्यशील इतिहास जमा झालंय.

उरले आहेत अवशेष जातीयतेचे,
उच्च नीचतेचे,सांप्रदायिकतेचे,
यादवीचे ,एकमेकाची लक्तरे
वेशीवरटांगणाऱ्या,बोलघेवड्या
पुढाऱ्यांच्या मागे मागे फिरणाऱ्या
लाचारांचे.

कणाहीन,रयाशून्य,शेळपट,शिपायांची
बजबजपुरी.उणीदुणी तेरा मेरा,
कलहाची बीजं,भांडणाची खोडं
तरारताहेत बेफाम

तरूणपिढी धावतेय काळ्या कुट्ट
काळोखात,चिक्कार नशापाणी करून.

Saturday, 11 June 2016

मन

मन कामरूप
क्षणोक्षणी बदलत असतं.
नवे नवे आकार घेऊन
स्वैर नाचतअसतं
नाचवत असतं.

इच्छाअसो नसो
तालावर त्याच्या
पावलं उचलावी लागतात.
नव्हे उचलली जातात.
गती त्याची अगम्य.
क्षणात गाठतं स्वर्गास
तर क्षणात नरकात
जाऊन बसतं.

शुद्ध,,स्वच्छ,निरिच्छ,पारदर्शी
स्फटिकासम.
घाणेरडंंतितकंच
दुर्गंधीनं गच्च भरलेल्या
गटारीसम.

वाहातं स्वच्छ झऱ्यासम.
गंभीर सागरासारखं.
खळाळणारं वेगानं धावणाऱ्या नदीसम.

जेव्हा बेचैन असतं
तडफडतं फडफडतं
जख्मी पक्ष्यासम.

शांतअसतं तेव्हा
दिसत नितळ स्तब्ध तळ्या सारखं
उद्विग्न होतं तेव्हा
वखवखतं ज्वालामुखी सम

क्रोधात तर बेभान, बेफाम होतं
हिंस्र बनतं ते
चेकाळलेल्या वाघा प्रमाणे
हल्ला प्रतिस्पर्ध्यावर करतं ते.
ओकत आग अंगप्रत्यंगातून.
डोळ्यातून बाहेर पडतात
ठिणग्या असंख्य.
शिवशिवतात हात नरडीचा
घोट घेण्यासाठी.

बेताल मनाचा थयथयाट
भयंकर असतो.
तेच प्रेमानं दयेनं
भरलं जातं तेवंहा
आर्द्र,आर्त होतं
ढाळतं अश्रु
निपचित.

तुझी किमया वेगळी

तुझी किमया वेगळी
आम्ही केवळ बाहुल्या
कळसुत्री
तुझी मायाआगळी
आम्ही केवळ सानुली
बालके तुझी.
तुझे देणे अदभुत
कुणाला न कळते
सूत्रधार तूच.
तुझ्याच हातात
कळ असते
फिरवतो जसजशी
तसेच सारे फिरत असते.
जुना तू खेळगडी
अनादि खेळ तुझा
कुणाला न उमगला
हेतू तुझा त्यातला.
तू मात्र खेळतअसतो
खेळवतो सर्वांना
तुलाच ठावुक
काय काय करतो तू?
साऱ्यांना समान न्याय.
भ्रमात मात्र त्यांना वाटते
आम्हीच खेळवतो
भाग्याला, निियतीला.

Friday, 10 June 2016

करिशी का तू खंत ?

करिशी का तू खंत ?
वेड्या हृदयी तुझ्या भगवंत
कृपा तयाची होताअद् भुत
हो दुःखाचा अंत.
भक्ती त्याची सुफलित होता
निर्धन हो धनवंत

आंधळ्यास तो देतो दृष्टी
पांगळ्यास तो देतो शक्ती
एक पाहतो सारी सृष्टी
दुसरा फिरे दिगंत

बहिऱ्याला येती कान
वेड्याला होई द्न्यान
बहुश्रुत होउन फिरे एक
तर दुसरा बने महंत

मुक्यास देतो वाचा शक्ती
करू लागता ईश्वर भक्ती
अलभ्य लाभे जीवन मुक्ती
मिळतो ब्रह्मानंद.

Thursday, 9 June 2016

जागा हो

जागा हो
जंगलचा राजा तू.
उगीच मेंढरू बनू नको.

स्वयमेव मृगेन्द्रता
हेच ब्रीद,हेच लक्ष्य
स्वभाव हाच.
स्वत्व विसरून
म्याँ म्याँ करू नकोस.

डरकाळी ऐकताच तुझी
सारे थरथरा कांपतील
शेपट्या घालून
दूरदूर पळून जातील

तू तर शक्तीशाली, साहसी
शिकार तुझी
तूच शोधून काढ
स्वतःची शिकार
होऊ देऊ नकोस
स्वतःच्या तेजाची,ओजाची
लाज ठेव.

लाचार,दीन,,हतबल
बनू नकोस.
उगीच कुणापुढे हात पसरून
भीक मुळीच मागू नकोस

मागून जगात कुणालाही
काहीही मिळत नसते
शक्ती स्वतःची पणाला लावून,
लढाई लढून
श्री,धी खेचून आणायची असते

पुरुषार्थअसतो संघर्षात
भित्र्यांना जग भिववतं
त्यांचं सारंच लुटून नेतं.

Wednesday, 8 June 2016

तुझ्या डोळ्यात डोळ्यात

तुझ्या डोळ्यात डोळ्यात आनंदाचे डोह
त्यात डुंबतो स्वानंदी माझा वेडा जीव

तुझ्या डोळ्यात डोळ्यात अमृत संचय
चैतन्य संचारते  जड  चेतनात

तुझ्या डोळ्यात डोळ्यात सौंदर्याची खाण
रोमारोमात तुझं संचारतं गाणं

तुझ्या डोळ्यात डोळ्यात माझं मीपण संपतं
अस्तित्वाचं भान तुझं माझं हरपतं

तुझ्या डोळ्यात डोळ्यात तुझं इंगित गुपित
अत्तराच्या कुपीतलंअमृत शिंपतं

अमृताचं घेता तीर्थ
होती मृतात्मे जीवित
मरगळलेले जीवजंतू
धूम पळती जोरात

पाहूनअघटित
मनातल्या मनात

  • स्तंभित स्तिमित

होई मी.

तुझ्या डोळ्यात डोळ्यात
त्यागाचे डोंगर
करुणेचे पाझर

तुझ्या डोळ्यात डोळ्यात
चैतन्याचे झरे
स्वानंदी वारे

तुझ्या डोळ्यात डोळ्यात
आनंद फुले
सत्याची फळे

तुझ्या डोळ्यात डोळ्यात
श्रेयस पांखरे
भिरभिरती चारीकडे

तुझ्या डोळ्यात डोळ्यात
ऐकू ये एकच नाद
तुझं माझं अद्वैत.

तुझ्या डोळ्यात डोळ्यात
आनंद पराग
होऊदे स्वार वाऱ्यावर

उडू दे स्वैर
आनंदी कारंजी
न्हाऊ दे तृप्त
तृषार्तांना.

मिळू दे त्यांना
त्यांचं ईप्सित
यथेच्छ करु दे
आकंठपान

फळे तेजाची
अवीट गोडीची
चाखू दे त्यांना
मन मुराद

धुतली जावो
अस्मिता पार
पुसला जावो

अहंभाव..

Monday, 6 June 2016

जीवन विषपेला

स्वप्नभंग झाला जीवन विषपेला
 कोण कुणास्तव जगतो येथे
 मुळी न कळते तुम्हा अम्हा ते
जगायचे ते राहून जाते
 ये अंतिम वेला

 मात,तात अन् सगे सोयरे
 पुत्र,पत्नी,वा पुत्र वधू ही
 अहिनकुलासम सोबत यांची
  अनुभव ना वेगळा.

 फुले पसरता कांटे मिळती
  अमृत देता विष ये हाती
  जीव लावता जीवच घेती
  अंती जीव जाई एकला

   कुणी न करतो सोबत तेव्हा
   जो तो म्हणतो जा बा जा बा
    जाणे येणे हाती न अपुल्या
    मानव कळ सुत्री बाहुला