Saturday, 23 July 2016

तरीही शोध सुरूच आहे.

तुझ्या अस्तित्वाविषयी
अनादि काला पासून
किंवदन्ती कितीतरी.
अनुकूल ,प्रतिकूल.
तुझे अस्तित्व स्वीकारणाऱ्या
नाकारणाऱ्या.
पण तुला त्याचे काय?
तू आपला गर्क
आपल्याच कामात.
निर्मिती,संगोपन,विनाश.
सारं सारं तुझं कर्तृत्व.
तुझ्या अनंत नावांचा
सतत घोष चालतो.
जप,ध्यान,तपश्चर्या
तुझ्या प्राप्तीसाठी
अनेक मंदिरे,पूजाघरे,
मशिदी,चर्चेस,गुरुद्वारे.
तुझ्या स्मृतीत
तुझ्या वास्तव्याची ठिकाणे.
तू तर यच्चयावत् प्राणी मात्रांच्या,
सजीव,निर्जीवांच्या
अंतरयामी वसतोस.
वाःदेवा,देवाधिदेवा,
मनःपूत धावा करणाऱ्यांना
पावतोस तू म्हणतात सारे.
तृप्त ते होतात.
इच्छा,आशा, आकांक्षा
साऱ्या साऱ्या होतात
पूर्ण सर्वांच्या.
म्हणून म्हणतात
पूर्ण तू पूर्ण मी
पूर्णातून पूर्ण काढले तरी
खाली उरते पूर्णच.
आगळी वेगळी वजाबाकी ही !
छे कोडं प्राचीन.
कुणालाच अद्याप
उलगडलं नाही.
तरीही शोध सुरूच आहे.

No comments:

Post a Comment