Sunday, 31 July 2016

तो पहातो अंतरग

फुले नकोत,गंध नको,
धूप नको,दीप नको
आरती वा स्तोत्र नको
शंख नको,ढोल नको
   हे तर बहिर्रंग.
तो पहातो अंतरंग
ते मात्र निर्मळ हवे
मलीन नको.
शुद्ध अंतरात
,प्रबुद्ध मनात
भगवंत असतो.
चित्त होता तदाकार
होतो साक्षात्कार
स्वत्व,अहंकार
ताठा वा अभिमान
सारं सारं विसरून
विनित भावे नम्र होऊन
माणसानं जावं
शरण त्याला.

 

Saturday, 30 July 2016

सद्गुरु सत्याचे,शिवाचे,मांगल्याचे आनद निधान

सद्गुरु कल्पतरु
वांच्छिले ते देतो भक्तां या
सद्गुरु चिंतामणी
चिंता घेऊन सर्वांच्या-
चिंतामुक्त करतो भक्तां या
सद्गुरु परीस,अद्भुत
जीवनरूपी लोहाचे
करतो  सोने-प्रेम कटाक्षे
पहाताच.
सद्गुरु मोक्षदाता
सद्गुरु त्राता
सद्गुरुच परमात्मा.
परात्पर तत्वदर्शी
दृष्टीदाता.
स्रष्टा सद्गुरु.
सद्गुरु माऊली
स्नेहाची साऊली
देते वत्सां या.
सद्गुरु परमपिता
रक्षिता, पोषिता
भक्तांचा.
सद्गुरु सत्याचे, शिवाचे, मांगल्याचे
आनंद निधान.
मोक्षाचे,मुक्तीचे,परमप्रीतीचे,भक्तीचे
विशुद्ध आश्रयस्थान.

Friday, 29 July 2016

जगी भरला परमानंद

आनंदी आनंद
जगी भरला परमानंद
चैतन्याच्या स्पर्श सुखाने
स्वैर पांखरे भिरभिरती
दाही दिशातून निनाद उठती
    गाती गाणी  धुंद
कळ्या कळ्या या हसती खुलती
मंद सुगंधा उधळून देती
गुंजारव भुंगेही करती
     मती होई गुंग
पान फुलांतून तेज ओघळे
फळाफळातील ओज आगळे
हरितांकुरही वाऱ्यासंगे
        नर्तनात दंग
प्रसन्न वदने उषा हासते
अरुण सारथी करी अभिवादन
तेजोधारा झरझर झरती
           पसरित नव रंग

Thursday, 28 July 2016

खरा एक सांगाती ,भगवंत

संतकृपा व्हावी
चित्त शुद्ध व्हावे
भाग्य उजळावे,अभाग्याचे
जन्म मरणाचा
फेर हा चुकावा
मुक्ती या जीवा, लाभो नित्य
संत चरणांची
घडो नित्य सेवा
वर हाच द्यावा,सद्गुरुराया
नको धनदारा
पुत्रादि काही
क्षणिक पसारा,मायावी हा
अंतकाळीचे हे
कुणी न सोबती
खरा एक सांगाती,भगवंत

Wednesday, 27 July 2016

साधक होऊन क्षण क्षण जगावं----

अंतिम सत्य ? अमूर्त,अनंत.
तत्व केवळ.निर्गुण,निराकार.
चैतन्य,प्राण,आत्मा!
प्रद्न्याचक्षूच पाहू शकतात त्याला.
तोच ईश्वर,तोचअहं,जड चेतनात तीच शक्ती-ब्रह्म वा भगवती,
 अनादि अनंत.
 तिला जाणताच सारं सारं समजू
 लागतं.विवेक जागा होतो.अंधार
 नाहिसा होतो.
 पडतो प्रकाश लखकन्.
 श्रेय तेच ,ईप्सित तेच.
 जीवनाचंअंतिम धेय्य तेच.
  जन्म केवळ त्यासाठीच.
  पुन्हा जाणं येणं टाळण्याचा
  गुह्य मार्ग,राज मार्ग तोच.तो.
   साधक होऊन क्षण क्षण जगावं
   जगण्यातला आनंद घ्यावा,
    आनंद द्यावा निरिच्छ होऊन .
     अनासक्त वृत्तीनं भोगावेत
     भोग सगळे यदृच्छया यथेच्छ.

तूच एक आधार---

तूच एक आधार
   देवा, तूच एक आधार
 जीवन नौका, तू नावाडी
वल्ही सारी तुझ्या हवाली
सुखेनैव ती पैलतिरावर
  जाऊदे करतार
येवो वादळ, उठोत लाटा
तुटोत तारे,नभही कोसळो
आद्न्या तव ही भुते मानिती
  करती ना अविचार
 तू निर्माता तूच पोषिता
  तू दाता अन् तूच त्राता
  देतो तू अन् घेतोही तू
    अन्य न पथ वा द्वार
मी शरणा गत नत तव पायी
प्रपंचात या पूर्ण गुंतलो
स्वत्व विसरलो दुःखी झालो
    होई फरफट फार

Monday, 25 July 2016

शोध घ्यावा आतल्या आत

हे जग आपलं नाही.
शरीरही कुठंय आपलं?
जरा,व्याधी, मरणाधीन.
इंद्रिये  पराधीन,भोगासक्त.
वाणी तरी कुठे स्वतंत्र?
मनही  चंचल.
संकल्प विकल्प रहित.
बुद्धी मलीन,भ्रमिष्ट.
माणसाला वाटतं
मी स्वतंत्र,स्वच्छंदी,स्वानंदी
भास सारा,गैरसमज.
सच्छिदानंद आत्म्याचा,
अस्तित्वाचा,चैतन्याचा
शोध घ्यावा आतल्या आत
अलिप्त राहून
शांतपणे छेडावा
ओंकार
अनादि,अनंत.
तो सुर लागताच
सारे सारे बदलते
दुःख,दैन्य,दारिद्र्य
दूरदूर पळते.
जीवनात संजीवन
माधुर्य येते

Sunday, 24 July 2016

नाम तुझे गोड-रूप सावळे सुंदर

नाम तुझे गोड
पुरविशी कोड
ठेविशी चाड
   भक्ताची तू
धावत येशी
उशीर न करशी
संकटी घेशी
   उडी सत्वर
पिलावर जैसी
नजर मातेची
तशी तुझी दृष्टी
   भक्तावर
तुलाच कळते
कुणा काय द्यावे
पात्रा पात्र ठावे
   देवा,तुला
भक्ता साठी देवा
अनवाणी पळशी
पुरविशी  त्याची
   इच्छा जी ती
गजेन्द्राने धावा
केला तेव्हां
धावत तू आला
   मदती साठी
द्रौपदीची हाक
ऐकून देवा
लज्जा राखण्याला
   आला तूच

रूप तुझे देवा
सांवळे ,सुंदर
दिसो निरंतर
   डोळ्यांना या
शांत तुझी दृष्टी
पहाताच सृष्टी
कुणी न राही कष्टी
   राऊळी या
भजनात दंग
पहा भक्त वृंद
वाजविती टाळ
   आणि मृदुंग
कीर्ती तुझी गाती
मूर्ती तुझी पाहती
गायनात विसरती
   देहभान.

Saturday, 23 July 2016

तरीही वेडं मन हाकारत राहतं तुला.

जेव्हां मन उदास होतं
निराशा, हताशा छळतात जीवाला
तेव्हां तुझी प्रकर्षानेआठवण येते.
भावूक मन भावनेच्या प्रवाहात
गटांगळ्या खातं.
तेव्हां तुझी प्रकर्षाने आठवण येते
अंतःकरण पिळवटून येतं
धडधड वाढते,धडपड थांबते.
क्रियाशीलता मंदावते.
तेव्हां तुझी प्रकर्षाने आठवण येते
फुलपांखरी जीवन तुझं.
गतीमान,स्वच्छंदी,बेबंद.
बंधनहीन हालचाल तुझी
डोळ्यांना सुखावते.
भावतं हृदयाला सारं काही.
वाटतं तुला सोडू नये.
पण-------------
असं होत नाही.साद घालूनही
तू मात्र येत नाहीस.
तरीही वेडं मन हाकारत राहात
तुला वारंवार.
न थकता,न विसावता.
परत परत तीच खेळी.तेच डाव,
तेच पत्ते,चाली त्याच.
तरीही कंटाळा मुळीच नाही.
अखंड चाल.खंडित काहीच नसतं.
सारं सारं विपरीत घडतं.
तरीही मनावर काहीच घ्यायचं नसतं.
हंसत हंसत साऱ्या साऱ्या बेरहम दुःखांना
आंतल्या आंत धुसमुसत बसायचं असतं.

तरीही शोध सुरूच आहे.

तुझ्या अस्तित्वाविषयी
अनादि काला पासून
किंवदन्ती कितीतरी.
अनुकूल ,प्रतिकूल.
तुझे अस्तित्व स्वीकारणाऱ्या
नाकारणाऱ्या.
पण तुला त्याचे काय?
तू आपला गर्क
आपल्याच कामात.
निर्मिती,संगोपन,विनाश.
सारं सारं तुझं कर्तृत्व.
तुझ्या अनंत नावांचा
सतत घोष चालतो.
जप,ध्यान,तपश्चर्या
तुझ्या प्राप्तीसाठी
अनेक मंदिरे,पूजाघरे,
मशिदी,चर्चेस,गुरुद्वारे.
तुझ्या स्मृतीत
तुझ्या वास्तव्याची ठिकाणे.
तू तर यच्चयावत् प्राणी मात्रांच्या,
सजीव,निर्जीवांच्या
अंतरयामी वसतोस.
वाःदेवा,देवाधिदेवा,
मनःपूत धावा करणाऱ्यांना
पावतोस तू म्हणतात सारे.
तृप्त ते होतात.
इच्छा,आशा, आकांक्षा
साऱ्या साऱ्या होतात
पूर्ण सर्वांच्या.
म्हणून म्हणतात
पूर्ण तू पूर्ण मी
पूर्णातून पूर्ण काढले तरी
खाली उरते पूर्णच.
आगळी वेगळी वजाबाकी ही !
छे कोडं प्राचीन.
कुणालाच अद्याप
उलगडलं नाही.
तरीही शोध सुरूच आहे.

Friday, 22 July 2016

नाम तुझे घेता

नाम तुझे घेता
जीभ होई धन्य
तुजवीण रामा
   आसरा न अन्य
नाम घेता घेता
देहभान नुरते
उरतो केवळ
   ब्रह्म भाव
आनंद तरंग
उठती हृदयी
लाभतो जीवा
   शांती ठेवा
नाम तुझे घेता
नुरे भव चिंता
तूच एक त्राता
   भवाब्धीचा
नाम तुझे घेता
मन हो उन्मन
समाधी धन
   लाभे जीवा
तुझे मी लेकरू
सांभाळ आता
नुरला अन्य
   वाली कोणी

Thursday, 21 July 2016

मग नसते कुठलीच भवभीती

प्रपंचात सुख नसते
सुखासाठी धडपड नुसती.
तडफड जीवाची.
प्रयत्नांची शर्थ.
प्रपंचच खोटा असतो.
संपत्ती असते,
संतती नसचे
.संततीअसूनही
सुख नसते.
प्रत्येकाच्या प्रपंचाात
काहीना काही उणीव असते.
ही सारी किमया
त्याची असते.
प्रपंच त्याचा
निमित्त तू
असा ठेव भाव
असू दे दृढ विश्वास.
मग बघ
प्रपंचाचा नूर बदलतो.
दुःख जाणवत नाही.
सारं सारं सुसह्य होतं.
सुकर होतं.
उणीव कुठंच राहात नाही.
हवी फक्त कृपा त्याची.
त्यासाठी नामावर त्याच्या
लागते जडावी प्रीती.
मग नसते कुठलीच भवभीती.

Wednesday, 20 July 2016

पुरुषार्थ असतो संघर्षात

जागा हो
जंगलचा राजा तू
उगीच मेंढरू बनू नको.
स्वयमेव मृगेंद्रता
हेच ब्रीद,हेच लक्ष्य,
स्वभाव हाच.
स्वत्व विसरून
म्यॉं म्यॉं करू नकोस.
डरकाळी ऐकताच तुझी
सारे थरथरा कांपतील.
शेपट्या घालून
दूरदूर पळून जातील.
तू तर मृगेंद्र
शक्तीशाली,साहसी.
शिकार तुझी
तूच शोधून काढ.
स्वतःची शिकार
होऊ देऊ नकोस.
स्वतःच्या तेजाची,ओजाची
लाज ठेव.
लाचार,दीन, हतबल
बनू नकोस.
उगीच कुणापुढे हात पसरून
भीक मुळीच मागू नकोस.
मागून जगात कुणालाही
काही ही मिळत नसते.
शक्ती स्वतःची पणाला लावून,
लढाई लढून
श्री,धी खेचून आणायची असते.
पुरुषार्थ असतो संघर्षात.
भित्र्यांना जग भिववतं
त्यांचं सारंच लुटून नेतं

चक्र

येणं ,जाणं ,जाणं,येणं
हाती आपल्या मुळीच नसतं.
नियतीच्या संकेतानं
सारं अपसुक घडत असतं.
संगत सोबत दोन दिसांची,
दोन घडीची की क्षणार्धतेची
काही काही कळत नसतं.
अंधारात दूर दूर
प्रकाशाचा शोध घेत
सान्त असून
अनंतास साद घालत
आस्ते आस्ते ठेचाळत
पुढे पुढे जायचं असतं.
जाणं, येणं
येणं ,जाणं
चक्र अबाधित चालत असतं.

Monday, 18 July 2016

संसार संसार


संसार संसार

उठा म्हणताच _उठावं
बसा म्हणताच_बसावं
चला म्हणताच
हूं चू न करता
निमूटपणे चालावं

नजर न उचलता
नजरबंद होऊन
नजरेच्या इशाऱ्यावर
सारं सारं करावं

तेव्हां कुठे
थोडीशी होते प्रशंसा !

संसार संसार यालाच म्हणायचं
जोजार सारा सहन करून
हसत हसत राह्यचं
गळ्यापर्यंत फसल्यावरही
गुपचुप बसायचं.

Sunday, 17 July 2016

जगाला हसता हसता

जगाला हसता हसता
स्वतःचंच हसं होतं
स्तंभित सारे विचारतात
असं का होतं .?
द्यावं तेच मिळतं,
पेरावं तेच उगवतं.
प्रकृतीचे नियम हे,
त्यांना अपवाद नसतो.
इतरांना फसवता फसवता
माणूस स्वतःच फसतो.
भूलथापा देता देता,
स्वतःलाच भूल पडते 
स्थिती विपरित होते,
माणूसपण हरवून जातं
आंधळी चाल असते
तोवर सारं ठीक असतं
"शो" म्हटल्यावर
हार निश्चित असते

Saturday, 16 July 2016

प्रकृती ,निसर्ग

 प्रकृती,निसर्ग
विकृती तिचा स्वभाव नसतो
श्रमणाऱ्याला कष्टकऱ्याला
प्रत्येकाला हवं ते देते
प्रकृती परोपकारी
आपपरभाव ,हेवेदावे,द्वेष,मत्सर
प्रकृतीच्या स्वभावात नसतात भाव हे
ती तर न्यायप्रिय,कर्तव्य कठोर
कुठलाही  स्वार्थी विचार मनात न ठेवता
देत असते सर्वांना
देते ती प्रकृती
घेते ती विकृती
प्रकृती कृतीवर भाळते
निढळाचा घाम गाळणाऱ्यावर प्रसन्न होते
भरभरून देते सुख समृद्धी
माणसाच्या जगात असे नसते
हिशोब असतो देणे घेणे असते
.देण्यापेक्षा घेणेच अधिक असते
त्यामुळे ईर्ष्या,द्वेष,मत्सर,लोभ
सारी सारी संघर्षाची पिले.
प्रकृतीत निरामय शांतता असते
मानवी जगात दुःख ,दैन्य,गरीबी,अगतिकता,लाचारी
माणूसच अविचारी
प्रकृतीचा स्वभाव बदलत नसतो
माणूस मात्र क्षणोक्षणी
रंग बदलणाऱ्या सरड्या प्रमाणे
रंग आपले बदलत असतो
शांत कधी बसत नसतो
हे हवं ते हवं हाव मुळी संपत नाही
तृप्ती होत नाही
सुख शांती समाधान
कधी त्याला मिळत नाही.