Friday, 22 July 2016

नाम तुझे घेता

नाम तुझे घेता
जीभ होई धन्य
तुजवीण रामा
   आसरा न अन्य
नाम घेता घेता
देहभान नुरते
उरतो केवळ
   ब्रह्म भाव
आनंद तरंग
उठती हृदयी
लाभतो जीवा
   शांती ठेवा
नाम तुझे घेता
नुरे भव चिंता
तूच एक त्राता
   भवाब्धीचा
नाम तुझे घेता
मन हो उन्मन
समाधी धन
   लाभे जीवा
तुझे मी लेकरू
सांभाळ आता
नुरला अन्य
   वाली कोणी

Thursday, 21 July 2016

मग नसते कुठलीच भवभीती

प्रपंचात सुख नसते
सुखासाठी धडपड नुसती.
तडफड जीवाची.
प्रयत्नांची शर्थ.
प्रपंचच खोटा असतो.
संपत्ती असते,
संतती नसचे
.संततीअसूनही
सुख नसते.
प्रत्येकाच्या प्रपंचाात
काहीना काही उणीव असते.
ही सारी किमया
त्याची असते.
प्रपंच त्याचा
निमित्त तू
असा ठेव भाव
असू दे दृढ विश्वास.
मग बघ
प्रपंचाचा नूर बदलतो.
दुःख जाणवत नाही.
सारं सारं सुसह्य होतं.
सुकर होतं.
उणीव कुठंच राहात नाही.
हवी फक्त कृपा त्याची.
त्यासाठी नामावर त्याच्या
लागते जडावी प्रीती.
मग नसते कुठलीच भवभीती.

Wednesday, 20 July 2016

पुरुषार्थ असतो संघर्षात

जागा हो
जंगलचा राजा तू
उगीच मेंढरू बनू नको.
स्वयमेव मृगेंद्रता
हेच ब्रीद,हेच लक्ष्य,
स्वभाव हाच.
स्वत्व विसरून
म्यॉं म्यॉं करू नकोस.
डरकाळी ऐकताच तुझी
सारे थरथरा कांपतील.
शेपट्या घालून
दूरदूर पळून जातील.
तू तर मृगेंद्र
शक्तीशाली,साहसी.
शिकार तुझी
तूच शोधून काढ.
स्वतःची शिकार
होऊ देऊ नकोस.
स्वतःच्या तेजाची,ओजाची
लाज ठेव.
लाचार,दीन, हतबल
बनू नकोस.
उगीच कुणापुढे हात पसरून
भीक मुळीच मागू नकोस.
मागून जगात कुणालाही
काही ही मिळत नसते.
शक्ती स्वतःची पणाला लावून,
लढाई लढून
श्री,धी खेचून आणायची असते.
पुरुषार्थ असतो संघर्षात.
भित्र्यांना जग भिववतं
त्यांचं सारंच लुटून नेतं

चक्र

येणं ,जाणं ,जाणं,येणं
हाती आपल्या मुळीच नसतं.
नियतीच्या संकेतानं
सारं अपसुक घडत असतं.
संगत सोबत दोन दिसांची,
दोन घडीची की क्षणार्धतेची
काही काही कळत नसतं.
अंधारात दूर दूर
प्रकाशाचा शोध घेत
सान्त असून
अनंतास साद घालत
आस्ते आस्ते ठेचाळत
पुढे पुढे जायचं असतं.
जाणं, येणं
येणं ,जाणं
चक्र अबाधित चालत असतं.

Monday, 18 July 2016

संसार संसार


संसार संसार

उठा म्हणताच _उठावं
बसा म्हणताच_बसावं
चला म्हणताच
हूं चू न करता
निमूटपणे चालावं

नजर न उचलता
नजरबंद होऊन
नजरेच्या इशाऱ्यावर
सारं सारं करावं

तेव्हां कुठे
थोडीशी होते प्रशंसा !

संसार संसार यालाच म्हणायचं
जोजार सारा सहन करून
हसत हसत राह्यचं
गळ्यापर्यंत फसल्यावरही
गुपचुप बसायचं.

Sunday, 17 July 2016

जगाला हसता हसता

जगाला हसता हसता
स्वतःचंच हसं होतं
स्तंभित सारे विचारतात
असं का होतं .?
द्यावं तेच मिळतं,
पेरावं तेच उगवतं.
प्रकृतीचे नियम हे,
त्यांना अपवाद नसतो.
इतरांना फसवता फसवता
माणूस स्वतःच फसतो.
भूलथापा देता देता,
स्वतःलाच भूल पडते 
स्थिती विपरित होते,
माणूसपण हरवून जातं
आंधळी चाल असते
तोवर सारं ठीक असतं
"शो" म्हटल्यावर
हार निश्चित असते

Saturday, 16 July 2016

प्रकृती ,निसर्ग

 प्रकृती,निसर्ग
विकृती तिचा स्वभाव नसतो
श्रमणाऱ्याला कष्टकऱ्याला
प्रत्येकाला हवं ते देते
प्रकृती परोपकारी
आपपरभाव ,हेवेदावे,द्वेष,मत्सर
प्रकृतीच्या स्वभावात नसतात भाव हे
ती तर न्यायप्रिय,कर्तव्य कठोर
कुठलाही  स्वार्थी विचार मनात न ठेवता
देत असते सर्वांना
देते ती प्रकृती
घेते ती विकृती
प्रकृती कृतीवर भाळते
निढळाचा घाम गाळणाऱ्यावर प्रसन्न होते
भरभरून देते सुख समृद्धी
माणसाच्या जगात असे नसते
हिशोब असतो देणे घेणे असते
.देण्यापेक्षा घेणेच अधिक असते
त्यामुळे ईर्ष्या,द्वेष,मत्सर,लोभ
सारी सारी संघर्षाची पिले.
प्रकृतीत निरामय शांतता असते
मानवी जगात दुःख ,दैन्य,गरीबी,अगतिकता,लाचारी
माणूसच अविचारी
प्रकृतीचा स्वभाव बदलत नसतो
माणूस मात्र क्षणोक्षणी
रंग बदलणाऱ्या सरड्या प्रमाणे
रंग आपले बदलत असतो
शांत कधी बसत नसतो
हे हवं ते हवं हाव मुळी संपत नाही
तृप्ती होत नाही
सुख शांती समाधान
कधी त्याला मिळत नाही.