Tuesday, 14 March 2017

मातीची विलक्षण किमया

पहाटे पहाटे फुले उमलली आहेत.चांदणी,चमेली,जाई,जुई,बोगनवेली,चाफा, सोनचाफा.विविधरंगांची व आकाराची फुले .जाई,जुईची नाजुक इवली इवली फुले.सोनचाफ्याची सोनरी रंगाची.बोगनवेलींचे अनेक रंग ,पारीजातकाचा झाडा खालीच पडलेला खच,जास्वंदीची लाल भडक फुले पांढरी.पिवळी,शेंदरी,लाल, निळी.अनेक रंगांच्या विविध छटा पाहून डोळे निवतात.मन हरखतं खरं म्हणजे फुलं झाडांवरच छान दिसतात.माणूस मात्र हे समजून घेत नाही. देवाला वाहण्यासाठी तो त्यांना हारात गुंफतो.प्रियतमेच्या डोक्यात माळण्या- साठी गजरे करतो.गुच्छ करतो.वाढदिवसाच्या निमित्ताने वेगवेगळे हार,गुच्छ दिले जातात.फुलांचा मंद सुगंध माणसाला धुंद करतो. मातीची किमया विलक्षण असते.एकाच जागी उभ्या असलेल्या विविध झाडांना वेगवेगळी पोषक द्रव्ये ती पुरवते.एकाच मातीत उगवणारं निंबाचं झाड कडू फळं धारण करतं.तिथंच असलेला आंबा गोड व रसाळ फळे देतो. आवळ्याला तुरट फळे .गुलाबाला कांटेही व धुंद करणारी सुवासिक फुले . एकच माती विविध झाडांनाब त्यांच्या त्यांच्या गरजे प्रमाणे विविध रस पुरवते. त्यांचं पोषण करते. माती जवळ आपपर भाव नसतो. आपला तुपला विचार नसतो.आमच्या जगात मात्र तसं का नसतं?

Monday, 13 March 2017

...इथले सारे इथेच राहाते

मी मी म्हणत म्हणत
सारं आयुष्य जातं
कोण मी? कुणाचा मी?
काही न कळता
सारं सारं संपतं
  पै पै जोडून
महाल उभा होतो.
जोडा जोड
करता करता
उपभोग राहून जातो.
कुणाला न सांगता
जीव एकटाच निघून जातो.
इथले सारे सारे
इथेच राहाते.
मित्र,परिवार,
सगे सोयरे
स्मशाना पर्यंत
सोबत करतात.
अश्रू दोन ढाळून
मेलेल्याला
विसरून जातात.

शब्दांचा खेळ सारा---