Friday, 28 October 2016

लोकशाहीच्या बुरख्याखाली------

खेडी वेडी
अजूनही मारताहेत गिरक्या
स्वतःभोवतीच.
त्यांच्या गिरक्या संपत नाहीत
दिवस पालटत नाहीत
विकास काही होत नाही
दारिद्र्य,दैन्य,अद्न्यान,
अंधश्रद्धा,बेकारी, बेरोजगारी
यांचाच धुडगुस
हैदोस यांचा--
सट्टा,दारू,जुगार
वेश्यांचा नंगा नाच
तमाशातील गण गौळणी
यांच्याच भोवती अजूनही
गिरगिर गिरगिर
फिरताहेत ती
दुःख,दैन्य त्यांचं संपत नाही
जात, धर्म, पंथांचं जोखड
निघत नाही.
स्वातंत्र्य,समता, बंधुत्व
या तत्वांचा ध्वज फडकत नाही.
लोकशाहीच्या बुरख्या खाली
पूर्वीची सरंजामदारीच
आजही टिकून आहे.

Thursday, 27 October 2016

हाच त्यांचा सामुहिक उपक्रम असतो---

सायंकाळी झोपडीत
धूम गर्दी असते
 स्वस्त दारूसाठी 
उद्ध्वस्त मनाचे,
बेपर्वा,बेदरकार,
बेफिकिर,तरूण
तिथंच झुंबड करतात

मधुशाला क्षणोक्षणी
बदलते रंग.
पिणारांना भान नसते
प्रत्येक जण
पहिल्या धारेचा
जोरदार माल मागतो.

जळजळ घशाजवळ
चिमुटभर मिठाची पुड
बोंबिलाचा तुकडा
शेव चुरमुरे
तिखट हिरव्या मिरच्या
कांद्याच्या उग्र फोडी.

प्रत्येक जण  येतांना
खूपखूप घाईत दिसतो
एकदा बैठक बसताच
आता माझी
एवढं थोडं
गोड आग्रह.

झिंगतात सारे
विसरतात घरे दारे
पत्नी पोरे
तर्र होऊन
लोळतात तिथेच.

मनं त्यांची सैल होतात
भराभर शब्द येतात
हातही उचलले जातात
बाचा बाची शब्दाशब्दी
उद्धार जन्मदात्या आईचा
बापाचा,इतरांचाही करतात ते

हाच त्यांचा
सामूहिक उपक्रम असतो
यातच त्यांना
पुरुषार्थ,पराक्रम दिसतो!

एकच तू करायचं-----

तू म्हणशील तर----
काहीही करीन मी
शिंगं आणीन सशाला
कंठ आणीन कावळ्याला
हवं तर----
गाढवालाही करीन शहाणा
बैलांना करीन राजे
तू सांग--
सांग अन् पाहा
करतो काय गमती जमती
कुणी म्हणे प्रियेसाठी
आणलं होतं आईचं काळीज
मी मात्र तुझ्यासाठी
आणीन अंड्याची भजी
हवंतर चतुरिके,
कोंबडीला घालीन कंठस्नान
वरून खायला देईन पान
पण गडे
एकच एक
एक तारीख
एकदाच येते
एका ग महिन्यातून
तेव्हां---
एकच तू करायचं
काढून मनातली खुळं
अहो, आणायचं एवढंच
एवढंच सांगायला विसरायचं
ऐकलं का ?

Tuesday, 25 October 2016

तंत्र व यंत्र युगाची हीच का प्रगती ?

इथं तिथं सर्वत्र
अशाच मुद्रा
वरुन हसऱ्या
आतून दुखऱ्या

मनातलं कुणी सांगत नाही
सांगतो तसं असत नाही
लेप मात्र सोनेरी,तकलुफी
बेगडी

जीवाला जाळणारे,छळणारे
असतात बोल
माधुर्याचं कवच लेवून
येतात पुढे

अशाच मुद्रा,अभद्रा
इथं तिथं सर्वत्र
ईर्ष्या ,द्वेष, असुया
यांचीच पिलावळ
वाढतेय सारखी
लपवालपवीच साऱ्यांची

प्रेम,स्नेह,सहकार्य,
गेलं कुठे ?
कुणास ठावूक?
क्षणात,विनाविलंब,नचुकता
मुद्रेतून होतात प्रगट
भाव सारे़

करावीशी वाटते घृणा
मन मात्र म्हणतं
करावी दया,करुणा
शक्य नसेल तर उपेक्षा
हाच उरतो एकमेव उपाय

हसरं ,निरामय,सर्वांना
हसवणारं,सुखवणारं
माणसांचं विश्व गेलं कुठे?
कळेना कुणाला कुणाला
उद्योगी तंत्र व यंत्र युगाची
हीच का प्रगती,सभ्यता,
नव मानवता?


Monday, 24 October 2016

बाल्य ----

हसतात मुले
काट्यात फुले
क्षणोक्षणी
कांती खुले
निष्पाप
निर्मोही
स्वानंदी
स्वच्छंदी
सुखवणारी
हसवणारी
लोभस.

निखालस
मऊमऊ
गोड स्पर्श
फुलांचा
मुलांचा
सहवास
सुखाचा.

बाल्य निरागस
क्षणभर हसणं
क्षणभर रुसणं
क्षणात रडणं
नको ते मागणं
आहे ते फेकणं
नाही ते मिळताच
किंचित हसणं
क्षणार्धात---
दूरवर भिरकावणं
हातातलं खेळणं

Sunday, 23 October 2016

मी-- मीच--माझ्यासमही मीच

मी---
मीच---
माझ्या समही मीच
स्वयंभू
स्वतंत्र
स्वाधीन संपूर्ण व्यक्तीमत्व!
सर्वात उठून दिसणारं

लोभस उठणं बसणं
बोलणं चालणं
सारं काही वेगळं
माझं मीपण

कुणीही कधीही
नाही केली बरोबरी
अनंत जन्म झाले तरी
मी---
मीच---
माझ्यासमही मीच .

Saturday, 22 October 2016

रोज रोज मरून मी-----

जगतो ?
छेः रोजच मरतो
हजारदा.
कसलं जिणं
लाजिरवाणं,लांच्छनास्पद
बापुडवाणं.
नाचतात पुढे पुढे रोजरोज
यमदूत जिवंत
भिववतात,भितो मी
उंदरागत लपतो बिळात
जगण्याच्या भीतीनं
निरर्थक खटाटोप.
कळतं
कळतं पण वळतं कुठे?
रोजरोज मरून मी
अजूनही जिवंतंच
हेच आश्चर्य!
--